मुंबईमध्ये बेस्ट बसला डंपरची जोरदार धडक, चालक जखमी

बेस्ट परिवहन विभागाच्या वांद्रे ते शिवाजीनगर मार्गावर प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या ३७५ क्रमांकाच्या बसगाडीला बैंगनवाडी जंक्शन या ठिकाणी शनिवारी दुपारच्या सुमारास समोरून आलेल्या डंपरने रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिली. या अपघातात बसचा चालक व वाहक हे जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने प्रवासी बचावले.

प्राप्त माहितीनुसार, बेस्ट परिवहन विभागाची ३७५ क्रमांकाची बसगाडी प्रवाशांना घेऊन शनिवारी दुपारी १२.४० वाजताच्या सुमारास अप दिशेने जाताना बैंगनवाडी जंक्शन येथे उजवे वळण घेण्यासाठी उभी असताना विरुद्ध दिशेने आलेल्या एका
डंपरने (क्रमांक एमएच ४३ बीटी ५१०७) एका रिक्षाला वाचवण्यासाठी सदर बसला जोरदार धडक दिली. तर सदर बसच्या मागून येणारा एक ट्रक ( क्रमांक एमएच ०१ बीटी ३९८३) त्या बसवर मागून बसला येऊन आदळला गेला.

यावेळी बेसावध बस प्रवासी, चालक, वाहक हे भयभीत झाले. या अपघातात बसचा चालक व वाहक हे दोघेही जखमी झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ नजीकच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रवासी बचावले. सदर अपघातग्रस्त बसच्या समोरील व मागील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे वाहतुकीला अडथळा झाला. मात्र स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. तसेच, बस वाहक व चालक यांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. मात्र या अपघातामुळे प्रवाशांना बसमधून खाली उतरून पर्यायी दुसऱ्या बसमधून व खासगी वाहनाने प्रवास करावा लागला. या अपघाताची पोलीस व बेस्ट प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत आहे.