घरमुंबईबाळासाहेबांच्या नावाने चित्रकला, तर अटलजींच्या नावाने काव्यस्पर्धा हवी!

बाळासाहेबांच्या नावाने चित्रकला, तर अटलजींच्या नावाने काव्यस्पर्धा हवी!

Subscribe

मुंबई महापालिकेतील शाळांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. आता त्याच धर्तीवर महापालिका शाळांमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने काव्यस्पर्धा आयोजित करण्याची मागणी भाजपने केली आहे. मुंबईत शिवसेना प्रमुखांच्या नावाने योजना राबवल्या जात असताना, भाजपनेही आता अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने अशा प्रकारच्या योजना राबवण्यासाठी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पावर बोलताना, भाजप नगरसेवक पंकज यादव यांनी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महापालिका शाळांमध्ये काव्यस्पर्धा आयोजित करण्याची मागणी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून २३ जानेवारी रोजी महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने मुंबईत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली, त्याचधर्तीवर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महापालिका शिक्षण विभागाच्यावतीने प्रत्येक शाळांमध्ये काव्यस्पर्धा आयोजित करण्याची मागणी यादव यांनी केली. या माध्यमातून महापालिका शाळांमधील बाल कवींची ओळख होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

व्हर्च्युअल क्लासरूम बंद करा…

मुंबई महापालिकेच्या शालेय मुलांसाठी व्हर्च्युअल क्लासरुम आणि स्ट्युडीओ बनवण्यात आला आहे. परंतु या क्लासरुमवरील खर्च अनाठायी असल्याचे सांगत यादव यांनी हे सर्व व्हर्च्युअल क्लासरुम बंद करण्याची मागणी केली आहे. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये आता डिजिटल क्लासरुम तयार करण्यात आलेले आहेत आणि काही वर्गांमध्ये असे वर्ग सुरु होत आहेत. त्यामुळे जे व्हर्च्युअलच्या माध्यमातून दाखवले जाते, तेच डिजिटलच्या माध्यमातून दाखवणे शक्य आहे. त्यामुळे व्हर्च्युअलच्या नावाखाली होणारी लूट महापालिकेने थांबवावी, असे सांगत एक प्रकारे यादव यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या योजनेचा समाचार घेतला. याबरोबरच त्यांनी महापालिका शाळांमधील ज्या मुलांनी अधिक गुण मिळवले आहेत, त्या मुलांना प्रसिद्धी देऊन महापालिका शाळांचे ब्रँड तयार केले जावे, अशीही सूचना केली.

मोडकसागर तानसाला मुलांची सहल

महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी मोडकसागर, तानसा आणि वैतरणा तलाव येथील जागा पयर्टनासाठी खुली करण्याचे जाहीर केले. परंतु, या सर्व जागा अतिसंवेदनशील असून बाहेरच्या माणसांना तिथे प्रवेश दिला जाऊ नये. या ऐवजी महापालिका शाळांची सहल या तिन्ही तलावांसह जलशुद्धीकरण केंद्रांच्या ठिकाणी करून, भावी पिढीला आपण किती किलोमीटर लांबीवरून पाणी आणले जाते? आणि कशाप्रकारे शुद्धीकरण केले जाते, याची माहिती देऊन एक प्रकारे पाणीबचतीच्या माध्यमातून जनजागृतीही करता येईल, असेही आपल्या भाषणात सांगितले. महापालिका शालेय इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला पाठवण्यात येत असले तरी अशा शाळांच्या निविदा काढण्यापूर्वी शिक्षण समितीची मान्यता घेतली जावी, अशीही सूचना यादव यांनी केली.

- Advertisement -

शिक्षण समितीचा अर्थसंकल्प मंजूर

महापालिका शिक्षण विभागासाठी आगामी अर्थसंकल्पात २९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पीय खर्चांमध्ये काही प्रमाणात फेरफार सुचवत शिक्षण समितीच्या सभेत याला मान्यता देण्यात आली. यामध्ये महापालिका शिक्षण विभागाच्या प्रसिद्धीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या निधीतून शिक्षण विभागाची प्रसिद्धी केली जाईल. ही प्रसिद्धी करताना अनेक मनोरंजन मालिका सुरु आहे, त्या मालिकांच्या दरम्यान शिक्षण विभागाच्या वतीने जाहिरात दाखवली जाईल, अशाप्रकारे प्रयत्न केला जावा, असे निर्देश शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -