…आणि नगरसेविकेने उचलली मास्क पुरवण्याची जबाबदारी!

rajeshree Shirwadkar

मुंबई महापालिकेने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्क लावण्याची सक्ती केली आहे. मास्क लावणे मुंबईकरांना बंधनकारक केल्यामुळे पोलिस, महापालिका कर्मचारी, कामगार, विभागातील नागरिकांना मास्क उपलब्ध करून देण्यासाठी भाजपच्या नगरसेविकेने चक्क शिलाई मशिनची व्यवस्था करत मास्कच्या शिलाईचे काम हाती घेतले आहे. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानंतर या नगरसेविकेने आतापर्यंत सहा हजार मास्क तयार केले असून करून त्याचे वाटपही केले आहे.

महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी ८ एप्रिल रोजी रस्त्यांवर, बाजारात जाताना मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी शीव येथील जागेत शिलाई मशिन उपलब्ध करून घेत महिलांसोबत मिळून मास्क तयार करण्याचा उपक्रम राबवण्यास सुरुवात केला. एकाबाजूला महापालिका मास्क लावणे बंधनकारक करत आहे, मात्र दुसरीकडे मास्क उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता हे मास्क तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राजेश्री शिरवडकर यांनी स्पष्ट केले.

या भागातील गारमेंटमध्ये कारणाऱ्या काही महिला आणि पुरुष यांची मदत घेऊन हे मास्क तयार करण्यात येत आहेत. आठ दिवसांमध्ये ६ हजार मास्क तयार करण्यात आले आहेत. हे मास्क एफ-उत्तर विभागातील महापालिकेचे कामगार, कर्मचारी, विभागातील नागरिक तसेच पोलीस आदींना मोफत वाटप केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

पोलीस आणि महापालिका कामगारांना नाश्ता

मास्कचे वाटप करण्याचा निर्णय घेतला असला तरी विभागातील महापालिकेचे कामगार, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी, अधिकारी यांना संध्याकाळचा नाश्ताही उपलब्ध करून देण्यात येत आहे. भाजपचे दक्षिण मध्य विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर आणि नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी सुरुवातील विभागातील लोकांना अन्न वाटपाची जबाबदारी स्वीकारताना संध्याकाळच्या नाश्त्याचीही जबाबदारी स्वीकारली होती. परंतु महापालिकेच्या वतीने अन्न वाटप सुरु होताच, त्यांनी अन्न पाकिटांचे वाटप करणे बंद केले. परंतु संध्याकाळचा नाश्ता सुरुच ठेवला आहे. जिथे कामगारांना आजच्या घडीला वडापाव, भजीपाव, मेंदूवडा असे पदार्थ पाहायला मिळत नाहीत, ते पदार्थ बनवून शिरवडकर दाम्पत्य महापालिकेचे कामगार आणि पोलिसांना संध्याकाळच्या वेळी उपलब्ध करून देतात.