घरताज्या घडामोडीसेनेनंतर भाजपचे आमदार नितेश राणे दगडी चाळीत, अश्विन नाईक यांचीही घेतली भेट

सेनेनंतर भाजपचे आमदार नितेश राणे दगडी चाळीत, अश्विन नाईक यांचीही घेतली भेट

Subscribe

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही जशी शिवसेनेसाठी महत्वाची आहे, तशीच भाजपसाठीसुद्धा प्रतिष्ठेची बनलेली आहे. मार्च २०२२ अखेरीस होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होणे हे अशक्यप्राय गोष्ट असल्याने आता दोन्ही बाजुने मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबई महापालिकेत महापौर बसवण्यासाठी ज्या छोट्या पक्षांची कायम मदत मिळणे आवश्यक असते, अशा मुंबईतील पक्षांना त्यांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेकडून सचिव मिलिंद नार्वेकर आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दोन दिवसांपूर्वी भायखळा आणि सातरस्ता येथील दुर्गा मातेचे दर्शन घेत अखिल भारतीय सेनेला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी भाजपकडून आमदार आणि मुंबई भाजपचे कोअर कमिटीचे सदस्य नितेश राणे यांनीही दगडी चाळीत जाऊन दुर्गामातेचे दर्शन घेतले. शिवसेनेकडून आणि भाजपकडून अरूण गवळी यांचे वारसदार असलेल्या गीता गवळी यांची भेट घेतली. तसेच अश्विन नाईक यांची आणि त्यांची मुलगी यांचीही भेट घेत, दोन्ही बाजुने आगामी महापालिका निवडणूकीत भायखळा, दगडी चाळ, आर्थर रोड, सातरस्ता, चिंचपोकळी येथील मराठी वोट बॅंक आपल्याकडे राहील याची पुरेपूर काळजी शिवसेना आणि भाजपने घेतली आहे.

- Advertisement -

दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईतील भायखळा, दगडी चाळ, आर्थर रोड, सातरस्ता, चिंचपोकळी हा भाग प्रत्येक पक्षासाठी महत्वाचा असतो. मागील २५ वर्षांपासून शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर भाजपच्या मदतीने फडकत आहे. मात्र २०१७ पासून दोन्ही पक्षांनी युती न केल्याने पहिल्यांदाच युतीतील दोन्ही पक्ष आमनेसामने उभे ठाकले होते. सध्या २२७ नगरसेवक असलेल्या मुंबईत महापालिकेत शिवसेना क्रमांक १ चा पक्ष तर भाजप क्रमांक २ चा पक्ष आहे. मात्र मागील निवडणूकीत २०१९ ची विधानसभा निवडणूक लक्षात घेता, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपला महापौर पदाची संधी असूनही शिवसेनेचा महापौर बनला होता. जी चूक मागील निवडणूकीत झाली, ती चूक या निवडणूकीत करायची नाही या उद्देशाने मुंबई भाजप निवडणूकीच्या रणांगणात उतरली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह कोअर कमिटीत असलेले आमदार अॅड. आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनिल राणे यांच्या खांद्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी आहे.

भाजपने नुकतेच मराठी कट्टा नावाने व्यासपीठ मुंबईकरांना उपलब्ध करून दिले असून, मराठी वोट बॅंक हातातून जाऊ नये यासाठी आता लोकसभेच्या सहा मतदारसंघाप्रमाणे भाजपच्या आमदारांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडे दक्षिण मध्य मुंबईची जबाबदारी असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गुरूवारी त्यांनी दगडी चाळीतील आणि आर्थर रोड येथील दुर्गा मातेचे दर्शन घेतले. याबाबत आपलं महानगरशी बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, आजही या दोन्ही ठिकाणी तळागाळातील कार्यकर्ते आहेत. आम्ही जसे उंचच उंच टॉवरकडे लक्ष केंद्रित करत आहोत, तसेच मुंबईच्या जडणघडणीत महत्वाच्या असलेल्या चाळ संस्कृतीकडेही आमचे लक्ष आहे. देवीच्या दर्शनासोबत दगडी चाळीत जाऊन अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी आणि आर्थर रोड येथे अश्विन नाईक आणि त्यांच्या मुलीची भेट घेतली. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, मात्र दोघांनाही भेटल्यावर असे जाणवले की, आजही त्यांचा शिवसेनेवर राग आहे. मुंबई महापालिका निवडणूकीला अजुन सहा महिने शिल्लक आहेत. भाजप केवळ शिवसेनेप्रमाणे निवडणूका आल्यावर भेटीगाठी घेत नाहीत, तर कायम कार्यकर्त्यांच्या आम्ही संपर्कात असतो, असेही नितेश म्हणाले.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या यावेळच्या निवडणूकीत नक्कीच भाजपची कामगिरी चांगली असेल आणि महापालिकेतील क्रमांक १ चा पक्ष बनेल या दृष्टीने आमची रणनिती सुरू आहे. केवळ निवडणूका आल्यावरती सेटिंग आणि अंडरस्टॅण्डिंग आम्ही करत नाही. मुंबई महापालिकेत ज्या पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे, तो पाहता मतदार नक्कीच शिवसेनेला सत्तेतून खाली खेचतील. या प्रवासात जे जे आमच्या सोबत येतील, त्या सर्वांना सोबत घेऊन भाजपचे कमळ मुंबई महापालिकेवर फुलवायचा निर्धार आम्ही सर्वांनी केला आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

‘या’ मराठी चाळींचा इतिहास काय ?

भायखळ्यातील दगडी चाळ ही गवळी टोळीचे मुख्यालय तर आर्थर रोड येथील टेनामेंट हे अमर नाईक टोळीचे. या दोन्ही टोळींची मुख्यालय एकमेकांपासून फार लांब नसली तरी त्यांची कार्यक्षेत्र मात्र लांब होती. गवळी टोळीच्या कारवाया या साधरणत: दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईत होत्या. तर अमर नाईकचे कार्यक्षेत्र मध्य मुंबई. त्यामुळे या दोन टोळ्यांमध्ये फारसा संघर्ष कधी झाला नाही. तुम्ही तुमचे काम करा, आम्ही आमचे.. या तत्त्वावर या दोन टोळ्या पूर्वी कार्यरत असत. अमर नाईक टोळीचे कार्यक्षेत्र असलेल्या दादरमध्ये गवळी टोळीने कधीही हस्तक्षेप केला नाही. तर गवळी टोळीचे कार्यक्षेत्र असलेल्या दक्षिण मुंबईत अमर नाईक टोळीने कधीच दादागिरी केली नाही.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -