घरमुंबई'स्पेशल छब्बीस' सिनेमा बघून बनला गुन्हेगार; ब्लॅकमेलर अखेर गजाआड

‘स्पेशल छब्बीस’ सिनेमा बघून बनला गुन्हेगार; ब्लॅकमेलर अखेर गजाआड

Subscribe

प्रशासकीय अधिकाऱ्याला इन्कम टॅक्सची भिती दाखवत त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या तोतया पोलिसाला कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सिध्देश पनवेलकर असे त्या तोतया पोलिसाचे नाव आहे. सिध्देश हा उच्चशिक्षीत असून पैशाची चटक त्याला लागली होती. ‘स्पेशल छब्बीस’ सिनेमा पाहून प्रभावीत होऊन त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात राहणारे सुरेश चव्हाण या म्हाडा अधिकाऱ्याला तब्बल १५ दिवसांपासून एक फोन येत होता. फोन करणारा व्यक्ती स्वत:ला राबोडी पोलीस ठाण्याचा अधिकारी सांगून सुरेश यांना ब्लॅकमेल करत होता. फोन करणारा व्यक्ती सुरेश यांना सांगायचा की, तुमच्यावर इन्कम टॅक्सच्या चौकशीबाबत माझ्याकडे तक्रार आली आहे. त्याचा तपास मी करत आहे. त्यातून तुमची सुटका करायची असल्यास मला पाच लाख रुपये द्या, अन्यथा कारवाईला तयार राहा. सुरेश चव्हाण यांची कोणतीही केस नसल्याने ते हैराण झाले होते. सुरूवातीला त्यांना कोणी तरी मस्करी करतो असे वाटले. पण वारंवार फोन येत होते. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले आहे. म्हाडा अधिकाऱ्याला धमकावणारा दुसरा कोणी नसून त्यांच्याच इमारतीमध्ये राहणारा सिध्देश पनवेलकर आहे. त्याला अटक करुन पोलिसांनी तपास सुरु केला. पोलीस हिसका मिळताच तो पोपटा सारखा बोलू लागला. ‘स्पेशल छब्बीस’ या चित्रपटातून त्यांनी प्रेरणा घेतली आणि गुन्हेगारी कारवाया करण्यास सुरूवात केली असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. प्रशासकिय अधिकारी, व्यावसायिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांना हेरून त्यांची माहिती काढायची आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा. पोलिसांना खात्री आहे की, त्याने अनेकांना अशाप्रकारे गंडा घातला आहे. सिध्देशच्या जाळ्यात अडकलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -