घरमुंबईमुंबईसह राज्यात पाच दिवसांचाच रक्तसाठा

मुंबईसह राज्यात पाच दिवसांचाच रक्तसाठा

Subscribe

संस्था, रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात मुंबईसह राज्यातील महत्वाच्या शहरांमधील रक्ताच्या साठ्यात मोठी तूट जाणवू लागल्याची बाब पुढे आली आहे. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी यासंबंधी माहिती देताना रक्ताच्या पुरवठ्यासाठी संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या मुंबईसह राज्यात पुढील 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विशेषत: महाराष्ट्रातील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक रक्तसाठ्यात कमतरता जाणवू लागली आहे. एका पाहणीत राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये रक्तसाठ्याची अत्यंत कमतरता जाणवू लागली असून, असा साठा केवळ पाच दिवस पुरेल इतक्याच प्रमाणात शिल्लक असल्याचे शिंगणे यांनी म्हटले आहे. रक्ताची ही अडचण दूर करण्यासाठी रक्तदात्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिंगणे यांनी केले आहे. संघटना आणि संस्थांनी रक्तदान शिबिरे योजून साठ्यात भर घालावी, असेही त्यांनी विनवले आहे.

- Advertisement -

राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, परिस्थितीजन्य अवस्था लक्षात घेता चर्चा त्याच दिशेने सुरू आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर कोरोना विषाणूची लागण होणार नाही, असे शिंगणे म्हणाले. दरम्यान, बुधवारी दिवसभरात राज्यात तब्बल 39544 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.

तर मृतांचा आकडासुद्धा लक्षणीयरीत्या वाढला असून दिवसभरात राज्यात तब्बल 227 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.34 टक्के असून मृत्यूदर 1.94 टक्क्यांवर पोहोचल्याचे ते म्हणाले. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 81 लाख 2 हजार 980 वर पोहचला आहे. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 40 लाख 727 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -