घरमुंबईCorona: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण

Corona: मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण

Subscribe

१ मार्च ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार

जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात कार्यरत असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा करण्यात आली आहे. यासह कोरोना संकट प्रादुर्भावाच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी मुंबई महापालिकेने एक योजना आणली आहे.

या योजनेनुसार कर्तव्यावर असताना एखादा कर्मचारी कोरोनाने दगावल्यास त्याच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे. कोरोनामुळे दगावणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक भरपाई देणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली असल्याचे सांगितले जात आहे. ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान साहाय्य हे फक्त आरोग्य सेवेतच नाही तर पालिकेच्या सर्वच कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ही विमा योजना लागू करण्यात आली आहे. फक्त परमनंट नव्हे तर काँट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ही मदत देण्यात येईल.

- Advertisement -

१ मार्च ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी ही योजना लागू राहणार असून कर्तव्य बजावताना कोरोना बाधा होऊन मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य देण्याची योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी या योजनेची घोषणा केली आहे. तसेच या योजनेमध्ये महानगरपालिकेच्या निधीमधूनच सहाय्य देण्यात येईल. सरकारच्या आदेशानंतर अवघ्या १० दिवसांत ही योजना तयार करुन ती लागू करण्यात आल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी जाहीर केले आहे.

अशी असणार या योजनेची वैशिष्ट्य

  • नियमित कामगार/कर्मचारी यांच्यासह कंत्राटी, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले, मानसेवी, रोजंदारी, तदर्थ तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनाही मृत्यू झाला तर सहाय्य मिळणार
  • Covid19 च्या साथीदरम्यान सेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला हा विमा लागू होईल
  • कोरोनाबाधित कामगार/कर्मचाऱ्यांवर महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये होणार मोफत उपचार
  • प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत, कोविड १९ शी सामना करणारे आरोग्य कर्मचारी यांचा विमा योजनेत यापूर्वीच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे असे कर्मचारी वगळून इतरांसाठी हे सानुग्रह सहाय्य योजना लागू असेल
  • केवळ कायम नाही तर कंत्राटी, रोजंदारी, आउटसोर्स्ड अशा सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश असणार
अशा प्रकरणांमध्ये ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य लागू 

कोविड १९ च्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार व मदत कार्ये या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत महानगरपालिकेतील विविध प्रवर्गातील कामगार/कर्मचारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंत्राटी कामगार, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले रोजंदारी/तदर्थ/मानसेवी कर्मचारी यांचा कोविड १९ संबंधित कर्तव्य बजावताना, कोविड १९ मुळे मृत्यू झाल्यास अशा प्रकरणांमध्ये ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य लागू असेल.


आता कोरोनाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांनाही ५० लाखांचं विमाकवच!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -