Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबई महापालिकेचे ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश; परिपत्रक मागे घेण्याची कर्मचाऱ्यांची...

मुंबई महापालिकेचे ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश; परिपत्रक मागे घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

अनेक कर्मचाऱ्यांनी या परिपत्रकाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी कामगार नेते रमाकांत बने यांनी केली आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत ५० वर्षांवरील नागरिकांना कामासाठी घराबाहेर पडल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची जास्त भीती आहे. मात्र, मुंबई महापालिकाच याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. पालिकेने एक परिपत्रक काढून ५०-५५ वर्षांवरील अधिकारी, कर्मचारी यांना कामावर बोलावले असल्याने उद्या त्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असा आरोप दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस व कामगार नेते रमाकांत बने यांनी केला आहे.

पालिकेने आपल्या ५०-५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना सेवासातत्याच्या नावाखाली कामावर बोलावणे चुकीचे असून हे परिपत्रक मागे घ्यावे, अशी मागणी रमाकांत बने यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचे दररोज ९ हजार ते १० हजार रुग्ण आढळून येत असून ५०-५५ रुग्णांचा मृत्यू होत आहे. सरकारी, पालिका व खासगी रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने बेड मिळत नाहीत.

- Advertisement -

आयसीयू बेड, रक्त, प्लाझ्मा, लस, रेमडेसिवीर यांचा तुटवडा जाणवत आहे. या भीषण परिस्थितीत ५० वर्षांवरील नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. त्याचप्रमाणे, सर्वसाधारण नागरिकांनाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्यास पालिकेने मनाई केली आहे.

या विदारक परिस्थितीत पालिकेनेच आपल्या ५०-५५ वर्षांवरील कर्मचारी, अधिकारी यांना सेवासातत्याच्या नावाखाली कामावर बोलावले आहे. तसेच, शारीरिक क्षमता तपासणीसाठी रुग्णालयात गेल्यास तेथे कोरोनाबाधित रुग्ण असल्याने त्याचा संसर्ग या कर्मचाऱ्यांना होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत पालिकेने एक परिपत्रक जारी केले असून पालिकेतील ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांनी त्या परिपत्रकाचा धसका घेतला आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांनी या परिपत्रकाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे परिपत्रक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी कामगार नेते रमाकांत बने यांनी केली आहे.

- Advertisement -