घरताज्या घडामोडीमुंबई महापालिका : कामकाजात काँग्रेस प्रथम, शिवसेना दुसऱ्या, तर समाजवादी तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई महापालिका : कामकाजात काँग्रेस प्रथम, शिवसेना दुसऱ्या, तर समाजवादी तिसऱ्या क्रमांकावर

Subscribe

प्रजा फाऊंडेशनने पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांच्या कामगिरीचा लेखाजोखा जाहीर केला.

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना प्रजा फाऊंडेशनने पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांच्या कामगिरीचा लेखाजोखा गुरुवारी ऑनलाईन जाहीर केला. महापालिकेत गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावत असून सेनेचा यापूर्वीचा मित्रपक्ष भाजप पहारेकरीची भूमिका वठवत आहे. असे असताना, २०१७ ते २०२१ या कालावधीत सर्व पक्षांमध्ये काँग्रेसची कामगिरी (५७.२१ टक्के) सर्वोत्तम ठरली आहे. त्यापाठोपाठ सत्ताधारी शिवसेनेचा (५५.८८ टक्के) दुसरा, तर समाजवादी पक्षाचा (५५.०५ टक्के) कामगिरीच्या बाबतीत तिसरा क्रमांक लागला. त्यामुळे काँग्रेसला या प्रगती अहवालाचा वापर पालिका निवडणुकीत करता येणार आहे.

तसेच २०२०-२१ मध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी चांगली कामगिरी केल्याने त्यांना श्रेणी-१ (गुण ८१.१२ टक्के), शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांना श्रेणी-२ (गुण ८०.४२ टक्के), तर भाजपचे नगरसेवक हरीश छेडा यांना श्रेणी-३ (गुण ७७.८१ टक्के) मिळाली आहे. मात्र, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पिछाडीवर पडलेली दिसते. प्रजा फाऊंडेशनने, २०१७ ते २०२१ कालावधीतील नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. मुंबई महापालिकेतील २२७ नगरसेवकांपैकी केवळ १० टक्के म्हणजेच २२ नगरसेवकांचा ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीत समावेश आहे. तर उर्वरित नगरसेवकांना ‘क’, ‘ड’, ‘ई’, ‘फ’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

गुलनाझ कुरेशी ‘मौनी नगरसेविका’

प्रजा फाऊंडेशनच्या या अहवालात, एमआयएम पक्षाच्या एकमेव नगरसेविका गुलनाझ कुरेशी यांनी २०१७ ते २०२१ या कालावधीत एकही प्रश्न उपस्थित न केल्याने त्या ‘मौनी नगरसेविका’ ठरल्या आहेत. त्याचप्रमाणे एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ३० टक्के नगरसेवकांनी एकही प्रश्न विचारलेला नाही. २०१७ ते २०२१ या कालावधीत ५० टक्के नगरसेवकांनी १७ प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच ९९.५५ टक्के नगरसेवकांनी नागरिकांच्या तक्रारीबाबत प्रश्न विचारताना प्राधान्य दिले नसल्याचे मत प्रजाने नोंदवले आहे.

पालिकेत सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीचा आढावा घेतल्यास, पालिकेत २०१२-१३ मध्ये नगरसेवकांची उपस्थिती ८१ टक्के, २०१४-१५ मध्ये ६९ टक्के, २०१७-१८ मध्ये ८२ टक्के, तर २०१९-२० मध्ये ७४ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे. म्हणजेच एकाही वर्षात सर्वपक्षीय नगरसेवकांची उपस्थिती ८३ टक्क्यांच्या वर गेलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -