घरताज्या घडामोडीब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनीला गळती; १२ तास आधीच दुरुस्तीचे काम पूर्ण

ब्रिटिशकालीन तानसा जलवाहिनीला गळती; १२ तास आधीच दुरुस्तीचे काम पूर्ण

Subscribe

तानसा जलवाहिनी एक नव्हे तर तब्बल पाच ठिकाणी फुटल्याचे दुरुस्ती कामाप्रसंगी निदर्शनास आले. सुदैवाने हे दुरुस्तीचे काम नियोजित वेळेच्या १२ तास अगोदरच पूर्ण करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई महापालिकेच्या जलाभियंता खात्याने सेनापती बापट मार्ग, गावडे चौक येथे जमिनीच्या खाली २५ फूट खोलवर असलेल्या १ हजार ४५० इंच व्यासाच्या तानसा जलवाहिला एक नव्हे तर तब्बल पाच ठिकाणी फुटल्याचे दुरुस्ती कामाप्रसंगी निदर्शनास आले. सुदैवाने हे दुरुस्तीचे काम नियोजित वेळेच्या १२ तास अगोदरच पूर्ण करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लाखो लिटर पाण्याची बचत

‘जी – दक्षिण’ विभाग अंतर्गत गावडे चौकात दीपक सिनेमाजवळ ब्रिटिशकालीन असलेल्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरु होते. तब्बल १ हजार ४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) जलवाहिनीची गळती सुरु होती. ही गळती थांबवण्यासाठी जल अभियंता खात्याने अहोरात्र प्रयत्न करुन विहित मुदतीच्या १२ तास आधीच काम पूर्ण केले. त्यामुळे पाणीबाणीचा फटका बसलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच लाखो लिटर पाण्याची बचत झाली आहे.

- Advertisement -

अतिशय आव्हानात्मक असे हे काम पार पाडताना एकूण पाच ठिकाणी आढळलेली गळती दुरुस्ती करण्यात आली आहे. यामुळे आता लाखो लिटर पाण्याची बचत होणार आहे. दुरुस्तीचे काम वेळेच्या आत आणि कौशल्याने पार पाडल्याबद्दल पथकातील अधिकारी – कर्मचारी यांचे महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे.

जलवाहिनीत शिरुन थांबवली गळती

सदर जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती करताना त्यावर दोन मॅनहोल लावण्यात आले आहेत. परिणामी, यापुढे जलवाहिनी दुरुस्ती करावी लागली तर, मोठे खोदकाम न करता तसेच वाहतुकीस अडथळा न येता या मॅनहोलद्वारे आत जाऊन दुरुस्ती करणे सहजसोपे जाणार आहे. सदर दुरुस्तीचे काम हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि तुलनेने आव्हानात्मक होते. कारण जमिनीपासून २५ ते ३० फूट  खोलवर आणि जलवाहिनीच्या आत २५ फूटावर असलेल्या मोठ्या गळतीचे दुरुस्ती करण्याचे खरे आव्हान होते.

- Advertisement -

एरवी या स्वरुपाच्या  कामासाठी कदाचित ६ ते ७ दिवस परिसरातील पाणीपुरवठा बंद करावा लागला असता. मात्र, अत्याधुनिक यंत्रसामुग्री, जेसीबी आणि पोकलेन, यांच्या सोबतीला एअर प्लाझ्मा कटिंग मशीनमुळे जलवाहिनीत पाण्याचा प्रवाह सुरु असताना मॅनहोल कापणे शक्य झाले आणि वेळ वाचला. सीसीटिव्ही क्राऊलर कॅमेरामुळे जलवाहिनीत आत प्रवेश करुन निरिक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता मिळाली. एअर ब्लोअर संयंत्रामुळे जलवाहिनीच्या आत हवेचा पुरवठा केला गेला. परिणामी, दुरुस्ती लवकर होण्यास मदत झाली. गळतीच्या कारणाने वाया जाणारे बहुमूल्य, असे लाखो लिटर पाणी वाचवण्यात यश तर आलेच, सोबत आता या परिसरातील होणारा पाणीपुरवठा सुरळीत व उच्च दाबाने सुरु झाला आहे.

जलवाहिनीच्या दुरुस्तीकरता २ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ३ डिसेंबर रोजी दुपारी २ या कालावधीत काम हाती घेण्यात आले. मात्र, गळती दुरुस्ती पथकाने ३ डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर २ वाजता म्हणजे विहित वेळेच्या १२ तास आधीच दुरुस्ती पूर्ण केली.


हेही वाचा – कोरोना काळातील जाहिरातींचे शुल्क माफ, वाढीव शुल्क १० वरून ५ टक्क्यांवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -