घरमुंबईहात गमावलेल्या प्रिंसला पालिकेची १० लाखांची भरपाई

हात गमावलेल्या प्रिंसला पालिकेची १० लाखांची भरपाई

Subscribe

यामध्ये पाच लाख रुपये प्रिंसच्या नावावर डिपॉझिट स्वरूपात ठेवण्यात येणार असून पाच लाख तातडीने देण्यात येणार असल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

पालिकेच्या केईएम रुग्णालयात ईसीजी मशीनमध्ये लागलेल्या आगीमुळे हात गमवावा लागलेल्या चार महिन्यांच्या प्रिंस राजभर याला १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज पालिकेने घेतला. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये पाच लाख रुपये प्रिंसच्या नावावर डिपॉझिट स्वरूपात ठेवण्यात येणार असून पाच लाख तातडीने देण्यात येणार असल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

प्रिंस याला केईएम रुग्णालयात हृदयावर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आला होते. मात्र ७ नोव्हेंबर रोजी ईसीजी मशिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत प्रिंसच्या हाताला आणि कानाला जबर इजा झाली. यामध्ये गँगरीन झाल्याने हात काढून टाकावा लागला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप शिवसेनेसह सर्वपक्षियांकडून केला जात होता. त्यामुळे पालिकेने दहा लाखांची भरपाई द्यावी अशी मागणीही करण्यात येत होती. त्यामुळे आज गटनेत्यांच्या विशेष बैठकीत दहा लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नायर रुग्णालयात दोन वर्षांपूर्वी एमआयआर मशिनमध्ये ओढला गेल्याने मृत्यू झालेल्या राजेश मारू यांच्या कुटुंबीयांनाही दहा लाख आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पालिकेच्या कार्यक्षेत्रात मृत्यूमुखी किंवा जखमी होणार्‍यांना तातडीने मदत करण्यासाठी ठोस धोरण बनवण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दिली.

- Advertisement -

पालिका रुग्णालयात ‘अमृत फार्मसी’

पालिकेच्या रुग्णालयात मुंबईसह राज्य आणि देशाच्या कानाकोपर्‍यातून अनेक व्याधींनी त्रस्त रुग्ण उपचारासाठी येत असतात. विशेषत: या रुग्णांमध्ये गोरगरीब रुग्णांची संख्या जास्त असते. त्यामुळे या रुग्णांना दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयाच्या धर्तीवर वाजवी दरात औषधे उपलब्ध करून देण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे. यासाठी ‘अमृत फार्मसी’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या ‘अमृत औषध भांडार’मध्ये गोरगरीबर रुणांना केवळ ४० टक्के किमतीत औषधे उपलब्ध होणार असल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -