घरCORONA UPDATEकोव्हिड वॉर्डात डॉक्टरच्या डोक्यावर पंखा पडला; नायरमधील घटना

कोव्हिड वॉर्डात डॉक्टरच्या डोक्यावर पंखा पडला; नायरमधील घटना

Subscribe

नायर हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डात ड्युटीवर असलेल्या डॉक्टरच्या डोक्यावर मंगळवारी दुपारी पंखा पडला. यामुळे डॉक्टर जखमी झाले असले तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्थानिक मार्ड प्रतिनिधीकडून सांगण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजता अचानक हा पंखा निखळून डॉक्टरवर पडला. त्यामुळे डॉक्टर चक्कर येऊन जमिनीवर पडले. सहकारी डॉक्टरांच्या‌ मदतीने त्यांना अत्यावश्यक वॉर्डात दाखल केले. जखमेतून रक्तस्त्राव झाला होता. त्यांचे सिटीस्कॅन करण्यात आले असल्याचे स्थानिक मार्डकडून सांगण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कोरोना ड्युटीसाठी डॉक्टरांचा तुटवडा भासत असतानाच अशी घटना घडल्याने चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र हे डॉक्टर उपचारानंतर पुन्हा कोरोना रुग्ण सेवेत रुजू झाले असल्याचे नायर अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

दरम्यान, एकीकडे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची कमतरता असल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण मात्र दिवसेंदिवस वाढतच आहेत. गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोनाचे १३७२ नवे रुग्ण सापडले असून आता मुंबईतली कोरोनाग्रस्तांची संख्या २३ हजार ९३५ झाली आहे. तर आज दिवसभरात ४१ कोरोनाग्रस्तांचा मुंबईत मृत्यू ओढवल्यामुळे आता मुंबईतल्या कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ८४१ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -