घरमुंबईनिवडणुकीमुळे सीईटी परीक्षा अडचणीत

निवडणुकीमुळे सीईटी परीक्षा अडचणीत

Subscribe

विद्यार्थ्यांचा त्रास टाळण्यासाठी सेलकडून ‘मिशन टार्गेट’ मोहीम

लोकसभा निवडणुकीमुळे अनेक परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीचा फटका आता अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेला बसण्याची शक्यता आहे. सीईटी सेलच्या राज्यभरातील केंद्रावरील संगणक लॅबमधील संगणक जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक कामकाजासाठी ताब्यात घेतले आहे. परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना संगणक उपलब्ध होणार नसल्याने सीईटीची परीक्षा अडचणीत सापडली आहे. संगणक नसल्याने परीक्षा कशी घ्यायची, असा प्रश्न सीईटी सेलसमोर निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांच्या दुसर्‍या क्रमांकाच्या पसंतीच्या केंद्रावर त्यांना परीक्षा देता यावी यासाठी सीईटी सेलकडून ‘मिशन टार्गेट’ मोहीम हाती घेतली आहे.

लोकसभा निवडणूक 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यामध्ये होणार आहे. त्याच दरम्यान राज्य सामाईक कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने राबवण्यात येणारी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 2 ते 13 मे दरम्यान होत आहे. सीईटी परीक्षेसाठी सीईटी सेलकडे तब्बल 4 लाख 12 हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. परंतु जिल्हाधिकार्‍यांनी राज्यातील सीईटी सेल विविध केंद्रावरील संगणक निवडणूक कामासाठी ताब्यात घेतल्याने याचा फटका तब्बल 12 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. सीईटीची परीक्षा पुढे ढकलता येणार नसल्याने व संगणकच उपलब्ध नसल्याने सीईटी परीक्षा अडचणीत सापडली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात येणारी अडचण लक्षात घेऊन सीईटी सेलने मुलांचे नुकसान टाळण्यासाठी ‘मिशन टार्गेट’ मोहिमेंतर्गत राज्यातील हिंगोली, परभणी, वाशिम अशा आठ जिल्ह्यांमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट प्लान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

या मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीच्या केंद्राऐवजी दुसर्‍या क्रमांकाच्या पसंतीचे केंद्र देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ‘मिशन टार्गेट’अंतर्गत विविध जिल्ह्यातील सीईटी सेलच्या केंद्रावरील संगणक उपलब्धता, आसन व्यवस्था, नेटवर्क व्यवस्था, अतिरिक्त संगणकांची संख्या, पर्यवेक्षक यांची पाहणी करण्यात येणार आहे. ही पाहणी करण्यासाठी सेलकडून चार संस्थाची नियुक्ती केली आहे. चार संस्था राज्यातील विविध भागांमध्ये 10 एप्रिलपर्यंत पाहणी करून त्यांचा अहवाल सीईटी सेलला सादर करणार आहे. चार संस्थाकडून आलेल्या अहवालानंतर विद्यार्थ्यांनी दुसर्‍या क्रमांकाच्या पसंतीच्या केंद्रावर अतिरिक्त संगणक उपलब्ध करून तात्पुरती लॅब उभारण्यात येणार आहे. ही लॅब 29 एप्रिलपर्यंत उभारण्यात येणार आहे. त्यानंतर 30 एप्रिलला त्याची तपासणी करून 2 मेपासून केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहेत, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ‘मिशन टार्गेट’अंतर्गत राज्यातील विविध केंद्रांवरील उपलब्धता तपासून विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या पसंतीच्या केंद्रावर त्यांच्या परीक्षेची व्यवस्था करण्यात येणार आहे.
– आनंद रायते, आयुक्त, सीईटी सेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -