घरताज्या घडामोडीडोंबिवलीच्या जावयासमोर समस्या मांडण्याआधीच डोंबिवलीकरांना पोलिसांनी अडवलं

डोंबिवलीच्या जावयासमोर समस्या मांडण्याआधीच डोंबिवलीकरांना पोलिसांनी अडवलं

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे डोंबिवलीचे जावई आहेत, मात्र डोंबिवलीकरांना आपल्या हक्काच्या मुख्यमंत्र्यांसमोर स्थानिकांना पोलिसांमुळे समस्या मांडता आल्या नाहीत.

डोंबिवलीतील प्रदूषण आणि गुलाबी रस्त्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दखल घेत आज पाहणी केली. मात्र मुख्यमंत्री स्वत: पाहणीसाठी येणार असल्याने शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली होती. प्रदूषणाने गुलाबी झालेले रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले, तर गटारातील गुलाबी पाणीही पंप लावून उपसण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे डोंबिवलीचे जावई आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर हक्काने आपल्या समस्या मांडण्यासाठी स्थानिक रहिवाशी प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी डोंबिवलीकरांची वाट अडवत डोंबिवलीच्या जावयाची भेट घेण्यास अटकाव केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यापर्यंत प्रदूषणाची समस्या पोहचली नसल्याची संतप्त भावना डोंबिवलीकरांनी व्यक्त केली.

डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी विभागातील फेज १ या परिसरात प्रदूषणामुळे रस्तेही गुलाबी बनले होते. तर गटारातील पाणीही गुलाबी झाले हेाते. डोंबिवलीकर वर्षोनुवर्षे सहन करत असलेली प्रदूषणाची समस्या पून्हा एकदा समोर आल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याची दखल घेत पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव ई. रविंद्रन यांच्यासह सर्वच अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हे वाचा – डोंबिवली प्रदूषण: हिरव्या पावसानंतर आता रस्ताही झाला गुलाबी

मुख्यमंत्री स्वत: पाहणीसाठी येणार असल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. एमआयडीसी परिसरातील खराब रस्त्याचे पालिकेकडून तातडीने डांबरीकरण करण्यात आले. गुलाबी रस्ता दिसून नये यासाठी पाण्याने रस्ता स्वच्छ करण्यात आला होता, तर गटारात साचलेले गुलाबी पाणीही पंप लावून उपसण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून प्रदूषणाच्या समस्येचा सामना करीत असल्याने मुख्यमंत्र्यांना भेटून समस्या मांडू, असा विचार स्थानिक नागरिकांनी केला होता. त्यासाठी एमआयडीसी परिसरात नागरिक गुलाबी रस्त्याच्या परिसरात जमा झाले होते. मात्र पोलिसांनी स्थानिक नागरिकांना मुख्यमंत्रयांना भेटू न देता त्या ठिकाणाहून बाहेर काढले.

सुरक्षेच्या कारणात्सव आम्हाला बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र कंपन्यांच्या संघटनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी आले होते. त्यांना मात्र पोलिसांकडून बाहेर काढण्यात आले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही प्रदूषणाच्या समस्येचा सामना करीत आहेात. प्रदूषणाची मुख्यमंत्र्याकडून दखल घेतल्याने सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर मांडण्यासाठी आम्ही सर्व नागरिक आलो होतो. मात्र पोलिसांनी आम्हाला मुख्यमंत्र्याना भेटता येणार नाही, असे सांगून जाणीवपूर्वक बाहेर काढलं. – राजू नलावडे, स्थानिक रहिवाशी  
- Advertisement -

 

आम्ही न्यायासाठी भांडतोय, तो उद्देश सफल झाला नाही. पोलिसांकडून दुजाभाव करण्यात आला. – विवेक देशपांडे, स्थानिक नागरिक

 

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. अवघे दहा ते पंधरा मिनीटे मुख्यमंत्र्यानी गुलाबी रस्त्याची पाहणी केली. मात्र प्रसिध्दी माध्यमांशी न बोलताच ते केडीएमसीत निघून गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -