घरमुंबईस्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांची पाण्यावरून बोंबाबोंब

स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांची पाण्यावरून बोंबाबोंब

Subscribe

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत मुबलक पाणीसाठा असतानाही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठा कमी दाबाने होतो, पाण्याची कमतरता भासते, दूषित पाणीपुरवठा होतो, पाण्याबाबत वारंवार तक्रार करूनही लक्ष दिले जात नाही, पाणी समस्या मार्गी लागत नाही, अशा अनेक तक्रारींचा पाढा सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत वाचला. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, पाणी समस्या सुटत नसल्याच्या निषेधार्थ सभा तहकुबी मांडली. त्यास भाजप वगळता इतर सर्वपक्षीयांनी समर्थन देत स्थायीचे कोणतेही कामकाज न होऊ देता सभा एकमताने तहकूब केली. रवी राजा यांनी, त्यांच्या विभागातील रावळी जलाशयाच्या दुरुस्तीचे काम केल्यापासून पाणी पुरवठ्यात कपात झाली असून नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याची तक्रार केली. लोक पाण्याचे बिल भरतात. उशीर झाला तर बिलाच्या रकमेवरील व्याजही भरावे लागते. त्यात काही कपात केली जात नाही तर मग पाणी कमी मिळत असताना बिलाच्या रकमेत कपात का केली जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी, दादारमधील जुन्या चाळीत पाणीपुरवठा कमी होत असून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पाणी गळती, चोरी यांकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी, त्यांच्या विभागातील म्हाडा कॉलनीमध्ये पाण्याची समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली. माजी महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांनी, त्यांच्या विभागात काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार केली. तर शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी, त्यांच्या विभागात ज्यावेळी पाणी कपात ४०% असेल तेव्हा ८०% पाणी कपात होत असते आणि त्याचा मोठा फटका झोपडपट्टीतील जनतेला बसत असल्याचे गाऱ्हाणे मांडले.
यावेळी, शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी, पाणी समस्या व त्यावरील उपाययोजना करण्याबाबत पालिकेने सल्लागार नेमण्याची मागणी केली. यावेळी, शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता पाटेकर, भाजपच्या ज्योती आळवणी, कमलेश यादव, हरीश भांदिर्गे, शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी, काँग्रेसचे आश्रफ आजमी, जावेद जुनेजा, यांनीही पाणी समस्येबाबत आपली नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

स्थायी समिती अध्यक्षांच्या घरात सात दिवस पाणी नाही

पवई येथे काही दुरुस्तीचे काम काढल्याने माझ्या घरात गेल्या सात दिवसांपासून पाणी नाही, अशी धक्कादायक माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बैठकीत दिली असता सर्वपक्षीय नगरसेवकांनाही धक्काच बसला.

पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा हवी -: अतिरिक्त आयुक्त

तलावात पाणीसाठा असून जर पाणी समस्या निर्माण होण्यास पाणी वितरण व्यवस्थेतील दोष कारणीभूत आहे. ही पाणी वितरण व्यवस्था सुधारली आणि पाणी पुरवठा करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे चावीवाले, व्हॉल्व्ह ऑपरेटर यांच्यावर कार्यकारी अभियंता यांनी नियंत्रण आणल्यास सर्वांना व्यवस्थित व समान पाणी पुरवठा करणे शक्य होईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. तसेच, मुंबईतील वाढते शहरीकरण,वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेवर येणारा ताण हे सुद्धा एक कारण असू शकते. प्रशासनाने अल्प व दिर्घकालिन उपाययोजना हाती घेतल्यास व पाण्याची नासाडी थांबवून पाणी काटकसर केल्यास पाणी समस्या सुटण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा- शर्जीलला माहिती होतं राज्य सरकार कमजोर, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -