घरमुंबईरखडलेल्या डंपिंग ग्राउंड, मलनि:सारण प्रकल्पावरून काँग्रेस आक्रमक

रखडलेल्या डंपिंग ग्राउंड, मलनि:सारण प्रकल्पावरून काँग्रेस आक्रमक

Subscribe

पूर्व उपनगरात ट्रॉमा सेंटर उभारण्याची मागणी, सत्ताधारी शिवसेनेवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक तोंडावर आली असताना मुंबईतील विविध समस्यांवरून मुंबई काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबईकरांच्या आरोग्याशी संबंधित डंपिंग ग्राऊंड, एसटीपी प्रकल्प यांची समस्या रखडण्यास सत्ताधारी शिवसेनेची अकार्यक्षमता कारणीभूत असल्याचा थेट आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असल्याने त्यांनी याप्रकरणी लक्ष घालून मुंबईतील क्षमता संपलेले देवनार, कांजूर डंपिंग ग्राउंड त्वरित बंद करावेत. डंपिंगसाठी तळोजा येथील भूखंडाची संपूर्ण जागा ताब्यात घ्यावी. तेथे आधुनिक पद्धतीने कचरा विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू करावी. मुंबईतील रखडलेल्या मलनि:सारण प्रकल्पाला गती द्यावी. पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथील ‘ट्रॉमा केअर सेंटर’ प्रमाणेच पूर्व उपनगरातही ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू करावे, अशी मागणी भाई जगताप यांनी केली आहे. जर हे प्रकल्प आगामी तीन महिन्यात मार्गी न लावल्यास काँग्रेस आंदोलन करणार असल्याचा इशाराही भाई जगताप यांनी दिला आहे.

ते मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा,संदेश कोंडविलकर, भूषण पाटील, नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईत दररोज ६,५०० ते ६,८०० मे. टन कचरा आजही देवनार, कांजूर डंपिंगवर टाकण्यात येत आहे. त्यामुळे पूर्व उपनगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तळोजा येथे मुंबईतील कचरा टाकण्यासाठी शासनाच्या मार्फत उपलब्ध होत असलेल्या ५२ हेक्टर जागेपैकी ३० हेक्टर जागा पालिकेने ताब्यात घेतली आहे उर्वरित जागाही त्वरित ताब्यात घेऊन तेथे मुंबईतील सर्व कचरा टाकून आधुनिक पद्धतीने त्यावर प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, असे भाई जगताप यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तसेच, मुंबईतील सांडपाणी, मलयुक्त पाणी हे काही प्रमाणातच प्रक्रिया करून समुद्रात थेट सोडण्यात येत आहे. त्यामुळे समुद्रातील पाणी प्रदूषित होऊन मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळेच राष्ट्रीय हरित लवादाने पालिकेला याप्रकरणी दोषी ठरवत २९.७५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून दर महिन्याला १० लाख रुपयांचा दंड भरावा लागत आहे. पालिका प्रशासन २०१७ पर्यंत मुंबईत काही ठिकाणी सांडपाणी, मलयुक्त जलावर प्रक्रिया करून ते पाणी समुद्रात सोडणे अपेक्षित असताना आज २०२१ साल व मार्च महिना उजाडला तरी प्रकल्पाची अंमलबजावणी झालेली नाही. हे प्रकल्प अडविणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, कोणामुळे हे प्रकल्प रखडले, त्यांचा शोध घेऊन पालिका आयुक्त यांनी त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी भाई जगताप यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -