घरताज्या घडामोडीतर फडणवीसांनी १३ ऑक्टोबरच्या बैठकीची माहिती घ्यावी - काँग्रेस

तर फडणवीसांनी १३ ऑक्टोबरच्या बैठकीची माहिती घ्यावी – काँग्रेस

Subscribe

लोकलमधून महिलांना प्रवास करू देण्यासंबंधीच्या राज्य सरकारच्या प्रयत्नात रेल्वेच्या संबंधितांनी खोडा घातला, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेल्वेची बाजू घेऊन एका दिवसात रेल्वे होत नसते, असं सांगत असतील तर त्यांनी १३ आक्टोबरच्या बैठकीत रेल्वे अधिकार्‍यांची भूमिका काय होती, हे जाणून घ्यावे, म्हणजे रेल्वेकडून राज्यावर कसा अन्याय होतो ते कळेल’, असा चिमटा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांना काढला आहे. दसर्‍याच्या मुहूर्तावर मुंबईतील रेल्वे प्रवासात महिलांना संधी देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता. तो रेल्वेच्या आडमुठ्या धोरणामुळे खंडित झाला आणि हा प्रवास लांबणीवर पडला. मात्र कोणतीही माहिती न घेता माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेल्वेची बाजू घेत एका दिवसात ही तयारी होत नसते, असे सांगत राज्य सरकारवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला.

देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद दौर्‍यावर असताना…

पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी राज्य सरकारला दोष दिला. हाच संदर्भ घेत काँग्रेसने रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. ‘लॉकडाऊननंतर महिला वर्गाला रेल्वे प्रवासात मुभा देण्याची विनंती राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती. यासाठी १३ आक्टोबरला दीर्घकाळ बैठक घेण्यात आली. या बैठकीला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महिलांना रेल्वेप्रवास करू द्यावा, या मागणीवर अधिकार्‍यांनी चक्क हात वर केले’, असा आरोप सचिन सावंत यानी केला आहे. ‘महिलांच्या लोकल प्रवासाबाबत अधिकार्‍यांवर कुणाचा दबाव होता, याची माहिती माजी मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी’, असं देखील सावंत म्हणाले.

- Advertisement -

राज्यातील लोकल प्रवासाबाबतही…

भाजप राजकारण करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला. ‘कोविड १९ संदर्भातील नियमावली आधीच ठरली होती. मग महिलांसाठी लोकल सुरु करण्यास काय अडचण होती?’ अशी विचारणा त्यांनी केली. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची तशी इच्छा नाही काय? असा थेट प्रश्‍न सचिन सावंत यांनी विचारला. कामाविना लोकं हैराण आहेत. त्यांना सुरळीत प्रवासाची व्यवस्था हवी आहे. ती रेल्वेकडे आहे. राज्य सरकारने विनंती केल्यावर महिलांच्या प्रवसाची व्यवस्था रेल्वेने करायला हवी. ते राज्य सरकारचे काम नाही. अशा व्यवस्थेबाबतही राजकारण होत असल्याबद्दल सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -