CoronaVirus : खासगी दवाखान्यांना महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेशी जोडा!

खासगी डॉक्टरांचीही सुरक्षा विचारात घेता सर्व दवाखाने व नर्सिंग होम्सना महापालिकेच्या आरोग्य सेवेशी संलग्न करून घ्यावे.

कोरोनाच्या भीतीने अनेक खासगी दवाखाने आणि नर्सिग होम्स बंद असून महापालिका आयुक्तांच्या निर्देशानंतरही या सेवा सर्वसामान्यांसाठी खुल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांची आरोग्य सुरक्षा लक्षात घेता तसेच खासगी डॉक्टरांचीही सुरक्षा विचारात घेता सर्व दवाखाने व नर्सिंग होम्सना महापालिकेच्या आरोग्य सेवेशी संलग्न करून घ्यावे.  महापालिकेच्यावतीने त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. जेणेकरून ‘नॉन कोविड’ रुग्णांवर या खासगी दवाखाने व नर्सिंग होम्स व शुश्रुषागृहांच्या माध्यमातून सेवा पुरवता येईल आणि महापालिकेला ‘कोविड’च्या रुग्णांवर आपले पूर्णपणे लक्ष वेधता येईल.

मुंबईत ‘कोरोना कोविड’चे रुग्ण आढळून आल्यापासून खासगी डॉक्टर व नर्सिंग होम्सनी आपली शटर डाऊन करून घरी बसण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे ‘नॉन कोविड’ रुग्णांचे उपचाराअभावी हाल होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सर्व खासगी दवाखाने व नर्सिंग होम्स यांना पुन्हा सुरु करण्याचे आवाहन केले. परंतु त्यानंतरही ते सुरु न केल्याने आता त्यांचे परवाने रद्द करून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

सध्या ‘नॉन कोविड’ रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय लक्षात घेता हे खासगी दवाखाने व नर्सिंग होम्स सुरु होणे आवश्यक आहे. याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, खासगी दवाखाने व नर्सिंग होम्समधील डॉक्टर तसेच नर्सेस यांची सुरक्षाही तेवढीच महत्वाची आहे. परंतु ते आणीबाणीच्या परिस्थितीत राहणे योग्य नाही. ही मोठी आपत्कालिन परिस्थिती असून मुंबईतील सर्व दवाखाने व नर्सिंग होम्स यांची सेवा महापालिकेच्या आरेाग्य सेवेशी संलग्न करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे अशाप्रकारे खासगी डॉक्टरांची सेवा महापालिकेशी संलग्न केल्यास त्यांना महापालिकेच्यावतीने पीपीई किटसह इतर सर्व यंत्रणा उपलब्ध करून दिली जावी. जेणेकरून ते ‘नॉन कोविड’ रुग्णांवर उपचार करतानाच कोविड रुग्णही एकप्रकारे महापालिकेला वर्ग करून ‘कोविड’ आणि ‘नॉन कोविड’ रुग्णांवरील उपचाराचा भार सांभाळतील, असे रवी राजा यांनी स्पष्ट केले.