घरमुंबईअत्यावश्यक सेवेत असतानाही आरटीओ अधिकाऱ्यांकडून सातत्याने पिळवणूक !

अत्यावश्यक सेवेत असतानाही आरटीओ अधिकाऱ्यांकडून सातत्याने पिळवणूक !

Subscribe

कोरोनायोध्दा बसचालक व वाहक ठाणे आरटीओ विभागाद्वारे सातत्याने होणाऱ्या या कारवाईत मनस्ताप सहन करत नाहक भरडले जात असून बस मालकांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुंबई बस मालक संघटना तीव्र निषेध करीत आहे. 

कोरोना महामारीमुळे खासगी वाहतूकदार व्यावसायिक प्रचंड आर्थिक संकटास सामोरे जात असताना लाॅकडाऊन शिथिल केल्याच्या काळातही केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली जात नसल्याने नाईलाजास्तव सर्व वाहने आरटीओ कार्यालयात जमा करण्याचे आंदोलन मुंबई बस मालक संघटना, व्यवस्थापन समितीने पुकारले होते. त्यांच्या विविध प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यावी याबाबत काही दिवसांपूर्वीच मुंबई बस मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

आश्वासनाची पूर्तता नाही  

या भेटीत आश्वासन दिले आणि त्यानुसार परिवहन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय वाहतूक कृती दलाची स्थापना केली गेली आणि या कृती दलाचा अहवाल सरकारला सादर होताच आम्हाला दिलासा देण्यात येईल असे सांगितले गेले. आश्वासन व कृती दलाची स्थापना झाल्यावर आम्ही आमचे वाहने जमा करण्याचे आंदोलन पुढील नोटीसपर्यंत पुढे ढकलले.परंतु आरटीओ विभागातील काही अधिकारी आपत्कालीन सेवा पुरविणाऱ्या आणि रूग्णालय तसेच बँक कर्मचार्‍यांना शहरात घेऊन जाणाऱ्या आमच्या बसेसना वारंवार अडवित आहेत. ठाणे परिवहन विभागाची भरारी पथके तपासणीच्या नावाखाली ठाणे घोडबंदर रोडच्या प्रवेशद्वारावर दररोज अर्धा तास किंवा त्याहून अधिक वेळ आमची बस वाहने थांबवित आहेत.

- Advertisement -

आदेशाचे पालन नाही..

शुक्रवारी सकाळी ८:३० वाजता ठाणे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी फाऊंटन हॉटेल, घोडबंदर रस्ता, ठाणे येथे नाकाबंदी करून वाहतूक अडवली होती. परिणामी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी केवळ एमएम क्षेत्रामध्ये नोंदणीकृत बस मालकांना कागदपत्रे वैध नसल्याचे सांगून दंडात्मक कारवाई करण्यात आली. आमच्या संघटनेचे सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सर्व वाहनांच्या कागदपत्रांची मुदत सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्याच्या आदेशासंदर्भात अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र संबंधित अधिकाऱ्याने वरिष्ठांकडून सर्व बसेस तपासण्याचे आदेश आहेत आणि आम्ही आपले कर्तव्य बजावत आहोत असे उत्तर दिले.

सोशल डिस्टसिंगचा फज्जा  

आरटीओच्या या  दैनंदिन कारवाईत अत्यावश्यक सेवांसाठी प्रवास करणार्‍या विविध लोकांना, नागरिकांना व बस चालक-मालकांना तपासणीच्या नावाखाली होणारा वेळेचा अपव्यय आणि छळ हा निषेधनीय आहे. कारण परिवहन विभागीय कार्यालये ही ३१ मार्च २०२० पासून बंद आहेत.त्यामुळे बस मालक केवळ लॉकडाऊन नंतर सर्व कागदपत्रे सत्यापित करू शकतात. बसच्या सर्व माहितीचे तपशील एका क्लिकवर एम-परिवहन अ‍ॅपवर पाहता येणे शक्य असताना देखील ठाणे परिवहन अधिकाऱ्यांमार्फत जाणीवपुर्वक दररोज सार्वजनिक सेवेची वाहतुक थांबविणे कितपत योग्य आहे. या कारवाईमुळे वाहतुकीस अडथळा, प्रवाशांची गैरसोय आणि सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडून त्यांच्या आरोग्य सुरक्षिततेवर परिणाम होतो.कोरोना आजाराच्या कठीण परिस्थितीतही लढा देणारे आमचे कोरोनायोध्दा बसचालक व वाहक ठाणे आरटीओ विभागाद्वारे सातत्याने होणाऱ्या या कारवाईत मनस्ताप सहन करत नाहक भरडले जात असून बस मालकांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुंबई बस मालक संघटना तीव्र निषेध करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -