घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : मुंबईत १२ जणांवर उपचार सुरू

करोना व्हायरस : मुंबईत १२ जणांवर उपचार सुरू

Subscribe

राज्यातील निरीक्षणाखालील १७४ प्रवासी करोना निगेटिव्ह आले आहेत. तर, सध्या १२ जण मुंबईत तर ३ जण नाशिकमध्ये आणि प्रत्येकी १ जण नांदेड येथे उपचारांसाठी दाखल झाले आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात असून आतापर्यंत राज्यातील निरीक्षणाखालील १७४ प्रवासी करोना निगेटिव्ह आले आहेत. तर, सध्या १२ जण मुंबईत तर ३ जण नाशिकमध्ये आणि प्रत्येकी १ जण नांदेड येथे उपचारांसाठी दाखल झाले आहेत. गुरुवारी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली. करोना प्रतिबंध आणि नियंत्रणाबाबत प्रत्येक जिल्ह्यानिहाय आढावा घेऊन मुख्य सचिवांनी यंत्रणेने करोनाची धास्ती न घेता आवश्यक ती खबरदारी मात्र घ्यायला हवी, हे स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील सोलापूर आणि लोणावळा येथे करोना रुग्ण आढळल्याच्या अफवा पसरल्या असून त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यातील निरीक्षणाखालील १७४ प्रवासी करोना निगेटिव्ह

५ मार्च पर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५८६ विमानांमधील ६९ हजार ५०२ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार, सर्व करोना बाधित देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यात पुणे आणि नागपूर विमानतळावर देखील स्क्रिनिंग सुरू होणार आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ४७४ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १८७ जणांना दाखल करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी १७४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. इतर १३ जणांचे अहवाल प्राप्त होतील. तर, सध्या १२ जण मुंबईत तर ३ जण नाशिकमध्ये आणि प्रत्येकी १ जण नांदेड येथे दाखल आहेत.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कार्यवाही

वुहान (चीन ) मधून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांकरिता विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येते. इतर बाधित देशातील प्रवाशांना लक्षणे असतील तरच विलगीकरण कक्षात भरती करुन त्याची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते. बाधित भागातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला १४ दिवसांसाठी घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे. या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते. याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सूचित करण्यात आले आहे. या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते.

या भागातील प्रवाशांचाही पाठपुरावा

मुंबई, पुणे, ठाणे यासह गडचिरोली, नांदेड, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर, अमरावती, नाशिक, पालघर, जळगाव, चंद्रपूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातूनही चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -