घरमुंबई'त्या' भूखंडांवर इमारत बांधताना ‘मियावाकी वन’ विकसित करणे बंधनकारक

‘त्या’ भूखंडांवर इमारत बांधताना ‘मियावाकी वन’ विकसित करणे बंधनकारक

Subscribe

मुंबई महापालिका क्षेत्रातील हरित क्षेत्रात वाढ होण्यासह पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी १० हजार चौरस मीटर पेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम करताना भूखंडाच्या खुल्या क्षेत्रावरील ५ टक्के भागात 'मियावाकी वन' विकसित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील हरित क्षेत्रात वाढ होण्यासह पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी १० हजार चौरस मीटर पेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम करताना भूखंडाच्या खुल्या क्षेत्रावरील ५ टक्के भागात ‘मियावाकी वन’ विकसित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अत्यंत कमी जागेत अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याच्या या पद्धतीमुळे महापालिका क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनास निश्चितच गती मिळेल, असा विश्वास उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी व्यक्त केला आहे. (Developing Miyawaki Forest is now mandatory)

महापालिका क्षेत्रातील १० हजार चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर इमारत बांधकाम करताना विकास नियंत्रण नियमावलीच्या संबंधित नियमांनुसार निर्धारित आकाराची जागा ही ‘खुले क्षेत्र’ असणे बंधनकारक आहे. यानुसार खुल्या क्षेत्रासाठी जेवढी जागा निर्धारित करण्यात येईल, त्या जागेच्या ५ टक्के इतक्या आकाराचे ‘मियावाकी वन’ विकसित करणे पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने आता बंधनकारक करण्यात आले आहे.

- Advertisement -

हे ‘मियावकी वन’ विकसित करण्यासाठी संबंधित विकासकाला काही तांत्रिक मार्गदर्शन लागल्यास त्याची माहिती उद्यान खात्याद्वारे देण्यात येणार आहे. महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाला ‘बांधकाम परवानगी’ (आय ओ डी / I.O.D.) विषयक अटींमध्ये मियावाकी वन विकसित करण्याच्या अटींचा समावेश करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत, अशी माहितीही जितेंद्र परदेशी यांनी दिली.

मुंबईत मेट्रो,मोनो रेल्वे, मिठी नदी व रस्ते रुंदीकरण आदी विविध विकास कामांच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. हजारो झाडे मूळच्या जागेवरून हटविण्यात आली. तर दुसरीकडे अनधिकृत बांधकामांसाठी समुद्र, खाडी किनारी भराव टाकून खारफुटी नष्ट केल्या जात आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान मुंबई महापालिकेसमोर उभे ठाकले होते.

- Advertisement -

त्यामधून मार्ग काढण्यासाठी आणि पर्यावरणाचा दर्जा राखण्यासाठी आणि पर्यावरणाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी मुंबई महापालिकेने कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी पद्धतीची ‘मियावाकी’ वने विकसित करण्याचा अभिनव प्रकल्प दोन वर्षांपूर्वीपासून राबविण्यास सुरुवात झाली. २६ जानेवारी २०२० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मियावाकी’ वनांचा शुभारंभ करण्यात आला होता.

मियावाकी वने ठरत आहेत मुंबईची फुफ्फुसे

या वनांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीची साधारणपणे दोन किंवा तीन वर्षे या वनांची नियमित देखभाल करावी लागते. त्यानंतर ही वने नैसर्गिकरित्या वाढत राहतात आणि आपल्याला अव्याहतपणे प्राणवायू देत राहतात. ही बाब लक्षात घेतल्यास मुंबईतील मियावाकी वनांना मुंबई शहराची फुफ्फुसे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सामान्य वनांच्या तुलनेत मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येणाऱ्या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात. एरवी सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो. त्यातुलनेत साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. तसेच साधारणपणे २ वर्षात विकसित होणा-या मियावाकी पद्धतीच्या वनांमध्ये झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात.


हेही वाचा – पवना लेकमध्ये बुडून मुंबईतील प्राध्यापकाचा मृत्यू, सोबत होते वेलिंगकरचेच वरिष्ठ सहकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -