घरमुंबई'त्या' घटनेमुळे नाराज झालेल्या आदित्य ठाकरेंनी महापौरांसह नगरसेवकांकडून घेतला माफीनामा

‘त्या’ घटनेमुळे नाराज झालेल्या आदित्य ठाकरेंनी महापौरांसह नगरसेवकांकडून घेतला माफीनामा

Subscribe

जी-दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्याच्या निवडणुकीत प्रशासनाचे अधिकारी न आल्यामुळे महापौरांसह प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी पुकारलेले आंदोलन आता त्यांच्याच अंगाशी आले आहे. या आंदोलनामुळे खुद्द शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे प्रचंड नाराज झाले. त्यामुळे महापौरांसह सर्वच सेनेच्या नगरसेवकांची त्यांनी खरडपट्टी काढली. एवढेच नव्हेतर या आंदोलनाप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी महापौरांसह सर्वच नगरसेवकांकडून स्पष्टीकरणासह बिनशर्त माफीनामा लिहून घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समितीच्या निवडणुका मागील आठवड्यातील बुधवार ते शुक्रवारी या कालावधीत पार पडल्या. मागील  बुधवारी पहिलीच जी-दक्षिण प्रभाग समितीची निवडणूक सकाळी दहा पार पडली. या निवडणुकीत प्रशासनाच्यावतीने उपायुक्त तसेच विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे हे उशिरा पोहोचले. याचा निषेध म्हणून विभागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. या आंदोलनात खुद्द महापौर किशोरी पेडणेकर याही सामील झाल्या आणि आयुक्तांवरही तोंडसुख घेत प्रशासनातील अधिकाऱ्यांविरोधात नाराजीचा सूर आळवला. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना महापौर आणि सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी अशाप्रकारे आंदोलन केल्यामुळे पक्ष अडचणीत आला होताच. शिवाय सत्ताधारी पक्षाची प्रशासनावर वचक नाही, हेही त्यांनी दाखवून दिले.

- Advertisement -

या घटनेनंतर महापौरांनी, आयुक्तांनी याप्रकरणी माफी मागितल्याचे प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केले. परंतु वस्तूस्थिती मात्र वेगळी आहे. या आंदोलनाच्या दिवशीच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापौरांसह ज्येष्ठ नगरसेवक आशिष चेंबुरकर आणि इतर नगरसेवकांची चांगलीच कानउघडणी करत त्यांची खरडपट्टी काढली. तसेच नगरसेवकांच्या या कृत्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजीही व्यक्त करत सर्वांकडून बिनशर्त माफीनामा लिहून घेतला. महापौर व चेंबूरकर हे ज्येष्ठ नगरसेवक आहेतच. शिवाय पक्षाचे विभागप्रमुखही आहेत. त्यांच्याकडून अशाप्रकारे चूक होणे हे पक्षाच्यादृष्टीकोनातून योग्य नसल्याने आदित्य ठाकरे हे अधिक नाराज झाले होते. त्यामुळे या सर्वांनी घडलेल्या प्रकाराचे स्पष्टीकरण देत माफिनाम्याच्या पत्रावर स्वाक्षरी करत ते आदित्य ठाकरे यांना सादर केला असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पुन्हा असा प्रकार होणार नाही असे लिहून देतानाच या नगरसेवकांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही नगरसेवकांशी सौजन्याने वागायला हवे, असेही नमूद केले असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर विभागातील नगरसेवकांना न विचारणारे शरद उघडे हे आता नगरसेवकांना विश्वासात घेऊ लागले आहेत. विभागातील नगरसेवकांबाबत प्रशासनातील अधिकारी सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करून निर्णय घेऊ लागले आहेत, असे विभागातील नगरसेवकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

२३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार, जयंत पाटलांनी केली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -