घरमुंबईबिल्डरांच्या वादात सिध्दार्थ कॉलनी अंधारात

बिल्डरांच्या वादात सिध्दार्थ कॉलनी अंधारात

Subscribe

गेल्या दशकभरापासून चेंबूरच्या सिध्दार्थ कॉलनीतील रहिवाशांनी तब्बल ६३ कोटी रुपयांची वीजबिले भरली नसल्याच्या आरोपावरून काल त्यांची वीजजोडणी कापण्यात आली. परंतु या प्रकाराला बिल्डरांचा वाद कारणीभूत असल्याचे रहिवाशी सांगत आहेत. त्यामुळे तब्बल ३ हजार २५० घरे अंधारात आहेत. ही कारवाई करताना गेल्या अनेक वर्षांपासून वेळेत देयके भरणाऱ्या ग्राहकांनाही रिलायन्स एनर्जीने वेठीस धरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून बिलेच मिळालेली नाहीत, त्यामुळे सूचना न देता करण्यात आलेली ही कारवाई चुकीची असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे.

सुरुवातीला २००५ साली येथील रहिवाशांच्या घरांबाबत एसआरए योजना राबवण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी प्रार्थना ग्रुप हा बिल्डर पुढे आला होता. मात्र काही रहिवाशांनी त्याचवेळी कार्तिक डेव्हलपर्सला आणले. त्यामुळे या दोन विकासकांत वादविवाद झाल्याने नंतर काही रहिवाशांनी ऋचा या तिसऱ्या बिल्डरकडे धाव घेतली. या बिल्डरने येथील रहिवाशांची वीज, पाणी आणि जमीन भाड्यापोटीची बिले भरण्याचे आश्वासन दिले. मात्र नंतर कार्तिक बिल्डर आणि ऋचा बिल्डरमध्ये मतभेद झाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना आता चार पाच महिन्यांपूर्वी रुपारेल लोकेश या बिल्डरला आणण्यात आले आहे. या विकासकाने रहिवाशांच्या थकीत वीजबिलातील सुमारे साडेबार कोटींची रक्कम रिलायन्सकडे भरणा केली. गेल्यावर्षीपर्यंत २००५ पासून आतापर्यंत थकीत असलेल्या बिलाचा आकडा हा ६२ कोटी होता. त्यापैकी साडेबारा कोटी भरुनही अजून ६३ कोटींची थकबाकी असल्याचे कसे सांगण्यात येते असा सवाल येथील रहिवाशांनी याबाबत बोलताना केला आहे.

- Advertisement -

अशी कारवाई यापूर्वीही झाली असून, बिल्डरला झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी काही रहिवासी संमतीपत्रे देत नसल्याने विकासक वीजबिले भरत नाहीत. त्यामुळे काल वीजमीटर तोडण्यात आल्याचे रहिवाशी सांगतात. तर काहीजणांची वीजबिले त्यांच्या बँकखात्यातून वळती केली जात होती. मात्र त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून बिलेच आली नसल्याने त्यांना ती भरता आलेली नाहीत. कालच्या कारवाईत त्यांचीही वीजजोडणी कापण्यात आल्याने यात आमचा काय दोष असा सवाल केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -