घरमुंबईमार्च अगोदरच कोकणचा हापूस बाजारात दाखल होणार

मार्च अगोदरच कोकणचा हापूस बाजारात दाखल होणार

Subscribe

दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा कोकणातील हापूस आंब्याच्या अगोदरच तीन महिने आधी बाजारात दाखल झाल्याने काही अंशी खवय्यांना त्याची चव चाखता आली. मात्र त्यात कोकणच्या गोडव्याची कमी असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत कोकणचा हापूस आंबा वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होईल, अशी अपेक्षा व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.

दरवर्षी कोकणाचा हापूस आंबा मार्च अथवा एप्रिलमध्ये बाजारात दाखल होता. त्या अगोदरच या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा बाजारात दाखल झाल्याने तो १७०० ते २००० च्या घरात विकला गेला. १५० ते २०० डझन आवक होणार्‍या आंब्याला चांगला प्रतिसाद असला तरी मात्र बाजारपेठा ओस पडल्या होत्या. त्यामुळे आंबा कुठे आला आणि कुठे गेला, अशी चर्चा होती. त्याचवेळी कोकणाचा हापूस फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होण्याची चर्चा असल्याने व्यापार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. त्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. यामुळे कोकणातील हापूस आंब्याला पोषक वातावरण निर्माण झाल्याने आंब्याला चांगली फळधारणा होत आहे. परिणामी या वेळी मार्चमध्ये सुरू होणारा आंब्याचा हंगाम फेब्रुवारी अखेरपासूनच सुरू होऊन मोठ्या प्रमाणात कोकणातील हापूसची आवक बाजारात होण्याची आशा आंबा बागायतदारांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे या वर्षाचा हापूस आंब्याचा हंगाम चांगला जाईल, अशी शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे.

- Advertisement -

मार्च ते एप्रिल आणि एप्रिल ते मे हे कोकणातील हापूस आंब्याचे मुख्य हंगाम मानले जातात. कारण या काळात मोठ्या प्रमाणात कोकणातील सर्वच भागांतील हापूस आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात येतो. त्यामुळे यादरम्यान हापूसचे दर सर्वसामान्यांनाही परवडतील या दरांवर उतरलेले असतात. त्यामुळे सर्वांना या फळांच्या राजाची चव चाखता येते. हंगामाअगोदर येणार्‍या या आंब्याला दरही चांगला मिळतो. त्यामुळे व्यापारीही या आंब्याचे स्वागत करतात. मात्र यावेळी दिवाळीनंतर आलेल्या पावसाने हापूस आंब्याला पकडलेला मोहोर गळून गेला असल्याने यावेळी बाजारात हवा तसा नेहमीसारखा कोकणातील हापूस आंबा बाजारात आलेला नाही. त्या मानाने इतर ठिकाणाचे आंबे बाजारात येत आहेत. मात्र त्यांना कोकणातील हापूसची सर नाही. या डिसेंबर महिन्यात हवा तसा हापूस आलेला नाही. मात्र ही उणीव फेब्रुवारीनंतर भरून निघणार आहे. आता पडलेल्या थंडीमुळे आंब्याच्या मोहराला चांगली फळधारणा झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीअखेरपर्यंत बाजारात चांगल्या हापूसची आवक होण्यास सुरुवात होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -