घरमुंबईजनतेला फसवल्याप्रकरणी ऊर्जामंत्र्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा; मनसेची पोलिसांत तक्रार

जनतेला फसवल्याप्रकरणी ऊर्जामंत्र्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा; मनसेची पोलिसांत तक्रार

Subscribe

वाढीव वीजबिलवरून मनसेने आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा सचिव आणि महाव्यवस्थापक बेस्ट यांच्या विरोधात जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करत मनसेने शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी तक्रार दाखल केली आहे. दिवाळीत गोड बातमी देऊ असं आश्वासन देण्यात आलं मात्र दिवाळीनंतर आश्वासनाच्या उलट निर्णय घेत जनतेची दिशाभूल आणि फसवणूक या सरकारने केली असा आरोप मनसेने केला.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा सचिव आणि महाव्यवस्थापक बेस्ट यांच्या विरोधात संगनमत करून मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत केली आहे. मनसेने सातत्याने वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलनं केली, तक्रारी केल्या मात्र, सरकारने केवळ आश्वासन दिली. ऊर्जामंत्री, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि वीज कंपन्यांचे प्रमुख अधिकारी यांच्यात अनेकदा बैठकाही झाल्या. प्रत्येक बैठकीनंतर वीजबिलात कपात करण्याबाबत निर्णय लवकरच घेऊ आणि नागरिकांना दिलासा देऊ, असं आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिलं. ऊर्जामंत्री वीजबिलात कपात करतील या आशेवर राज्यातील नागरिक असताना उर्जामंत्र्यांनी अचानक घुमजाव केला आणि प्रत्येक विजग्राहकाला वीजबिल भरावं लागेल असा फर्मान काढला. त्यामुळे ही जनतेची फसवणूक असून यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असं मनसेने तक्रारीत म्हटलं आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -