घरमुंबईएक कोटींचा गंडा घालणारी ‘नकली’ चौकडी गजाआड

एक कोटींचा गंडा घालणारी ‘नकली’ चौकडी गजाआड

Subscribe

टोळीतील पोलीस, कलाकार, सोन्याची बिस्किटे, दागिने, नोटा सगळेच नकली

प्रख्यात मंदिराच्या दानपेटीतील रक्कम व ऐवज सवलतीत देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणार्‍या नकली पोलीस आणि कथित सिने कलाकारासह चौकडीला शिळ डायघर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. या टोळीने सर्वसामान्य नागरिकांची तब्बल एक कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या टोळीच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. ही टोळी राज्यातील तब्बल 253 मोबाईल सीमकार्डचा वापर गुन्हे करण्यासाठी करत होती. या चारही आरोपींना ठाणे न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी बुधवारी दिली.

कुर्ला येथील चामड्याचा (लेदर) व्यवसाय करणारे निषाद शेख यांना कमल आणि चेतन या व्यक्तींनी कल्याण फाटा येथे बोलवून योग्य दरात लेदर देतो असे सांगून 2 लाख रुपये घेतले. त्यानंतर गोदाम दाखवण्याचा बहाणा करून पळ काढला. याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर शिळडायघर पोलिसांनी तपास सुरू केला. कमल आणि चेतन हे दोघे मोबाईल तंत्रज्ञानाने अवगत होते. ते वेळोवेळी आपले मोबाईल आणि सीम कार्ड बदलत होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून या दोघांचे मोबाईल नंबर हस्तगत केले. त्याआधारे भीमराज मालजी उर्फ चेतन मांजिद (31 रा. गोवंडी), प्रवीण वर्मा उर्फ कमल (29 रा.मुंब्रा),मल्लेश डिंगी उर्फ मल्लू (47 रा.भिवंडी) आणि चौडप्पा कालोर (38 रा.भिवंडी) अशा चौघांना अटक केली. यातील भीमराज हा कथित सिनेकलाकार असून अनेक टिव्ही मालिकांमध्ये त्याने काम केल्याचा दावा पोलिसांनी केला, तर मल्लू हा बोगस पोलीस आहे.

- Advertisement -

हे चौघेही सर्वसामान्य व्यक्ती हेरून त्यांचा विश्वास संपादन करून शिर्डी तसेच सिद्धिविनायक मंदिरांमध्ये गोळा होणारी चिल्लर, सोन्याची बिस्किटे देण्याचे प्रलोभन दाखवून त्याबदल्यात कमी रक्कम स्वीकारण्याचा बहाणा करून पैसे घेत होते. तसेच हा सौदा होत असतानाच पोलिसांचा छापा पडल्याचे भासवून धूम ठोकत होते. त्यांनी अनेकांना अशीच कमी किमतीत सोन्याची बिस्किटे आणि दागिने दिले होते. मात्र, हा सर्व मुद्देमाल नकली असल्याचे स्पष्ट झाल्याने फसवणूक झालेल्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

तब्बल एक कोटींची फसवणूक करणार्‍या या टोळीने आसाम, मध्यप्रदेश आदी राज्यातील 253 मोबाईल सीमकार्डचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 10 मोबाईल फोन, 28 हजारांची रोकड आणि फसवणुकीकरता वापरण्यात आलेल्या नकली नोटा, नकली सोन्याची बिस्किटे असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -