घरमुंबईनवस केल्यामुळेच माझा पुनर्जन्म झालाय

नवस केल्यामुळेच माझा पुनर्जन्म झालाय

Subscribe

गणपती हे माझंच नव्हेतर ,अतिशय श्रद्धेनं,शुद्ध अंत:करणाने पावित्र्य आणि मांगल्य लेऊन एक श्रद्धास्थान म्हणून जवळ-जवळ सर्वचजण त्याची पूजा करतात.आमच्या घरात या गणेशाचं आगमन १९६५ सालापासून झालं आहे.माझ्या आई-वडिलांनी माझी आजी असताना आमच्या राबोडी कोळीवाड्यामधील स्वत:च्या घरामध्ये या गणेशाची स्थापना केली होती.आमचा गणपती हा नवसाचा गणपती आहे.माझ्या आई-वडिलांनी मला सांगितले होते की,मी आठ महिन्यांचा असताना माझी तब्येत अचानक बिघडली व सिरियस झालो होतो.त्यावेळेस माझ्या आई-वडिलांनी नवस बोलला होता की,आमच्या बाळाची तब्येत चांगली होऊ दे ,तब्येत बरी झाल्यास या घरात गणेशाची स्थापना करू आणि तेव्हापासून आमच्या घरात श्रीगणेशाची प्रतिस्थापना होऊ लागली. त्यावेळी आमच्या परिसरात घरगुती गणपती विशेष नसल्याने आमच्या गणपतीला राबोडी कोळीवाड्यातले बरेच भाविक दर्शनाला यायला लागले त्यामुळे यादिवसात एकप्रकारे आमच्या गणपतीला यात्रेचे स्वरूप यायचे.कोकण म्हणजे सिंधूदूर्ग,रत्नागिरीच नव्हे तर ठाणेसुद्धा आहे त्यामुळे कोकणा एवढीच मजा आमच्या गणपतीलाही यायची.मित्रमंडळी व नातेवाईक दर्शन झाल्यानंतर महाप्रसाद घेऊन जात असत. गणपतीपुढे रात्रभर नाचगाणी, कोळी पद्धतीची गाणी ढोलकीच्या सुरात वाजवून व अशा गाण्यातून तसेच पारंपारिक प्रार्थनेद्वारे श्री गणेशाचे रूप समोर आणीत असत. अशाप्रकारे महिलाही यावेळी मोठ्या प्रमाणावर नाचत गाणी गात जागरण करीत असतात.

माझा पुनर्जन्म झाल्याचा आनंदाने माझे आईवडील श्रीगणेश चतुर्थी पासून ते गौरीविसर्जन पर्यंत आरास व पूजा -आरती करायचे.मला समजायला लागल्यानंतर माझी मोठी बहिण रजनी मधुकर वैती व छोटी बहिण शशिकला आणि आणि छोटा भाऊ संजय वामन तरे ,माझ्या सगळ्या आत्या, त्यांची मुलं गणपती विसर्जन होईपर्यंत आमच्याकडे रहातात यामुळे एक वेगळाचआनंदाचं वातावरण घरात असते.

- Advertisement -

आज आमच्या गणपतीला ६६ वर्ष पूर्ण होतायत. दिवस बदलले, घर बदलले परंतु गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये कुठेही व कधीही खंड पडला नाही. आमच्याकडे सकाळ, संध्याकाळ व रात्री न चुकता तीनवेळा आरती होत असते आमच्या परिसरात विशेष गणपती नसल्यामुळे आमचा गणपती मानाचा गणपती म्हणून समजला जातो. त्यामुळे आमच्याकडे गणपतीला प्रचंड गर्दी होत असते तसेच विशेष आरतीही होत असते.

गौरी-गणपती बरोबर विसर्जन होणा-या आमच्या गणपतीबरोबर राबोडी कोळीवाड्यातील सर्व गणपती एकाच दिवशी, एकाच वेळी विसर्जनासाठी निघत असतात. यावेळी कोळीवाड्या- तील सर्व नागरिक ,आप्तस्वकीय व हितचिंतक या गणेशविसर्जन मिरवणुकीत सामील होत असतात. ही प्रथा आजसुद्धा सुरू आहे.

- Advertisement -

मी सकाळ -संध्याकाळ आरतीला न चुकता हजर असतो. बाहेर जाताना, आरतीची वेळ अँडजेस्ट करतो परंतु आरती केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही .रोज आरतीच्यावेळेस तीस ते चाळीस लोक हजर असतात कंटाळवाण्या आरत्या न घेता ठराविक आरत्या टाळ व ढोलकीच्या तालावर घेत असतो. गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापने पासून ते गौरी-गणणपती विसर्जनपर्यंत जेवढा वेळ आम्ही घरी असतो तेवढा वेळ वर्षभर कधीच घरी नसतो.

श्रीगणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत घरगुती,सार्वजनिक मानाचे गणपती तसेच लालबागचा राजा असे सुमारे सुमारे अडीचशे गणपतींचे दर्शन मी दरवर्षी घेत असतो.आमदार असताना तळकोकणातील गणपती दर्शनाला ही मी जात असे.
मी स्वत: शाडूची आणि पाण्याच्या रंगाने रंगवलेली गणेशमूर्ती आणीत असतो. पर्यावरणाचा -हास हा गणपती मूर्ती विसर्जनामुळे अथवा त्याच्या पूजेसाठी लागणा-या निर्माल्यामुळे झाला नसून तो शासकीय व्यवस्थेच्या निष्क्रियतेमुळे झाला आहे. निर्माल्य हे वाहत्या पाण्यात सोडलं पाहिजे अशी लोकांची भावना आहे, तेव्हा ते लोकांनी पाण्यात विसर्जन झाल्यानंतर शासकीय यंत्रणेने ते पाण्यातून बाहेर काढून त्यावर प्रक्रिया करावयास करावी. समुद्रात सांडपाणी, गटाराचे पाणी, केमिकल कंपन्यांचे पाणी सोडले जाते त्याने पर्यावरणाचा -हास होत नाही का? तरीही गणेश मूर्तीसाठी प्लास्टर अँड पॅरिस व घातक रंगाचा वापर करू नका असं मी गणेशभक्तांना आवाहन करतो .wलोक देवाकडे नवस करतात, मागणं मागतात; देव तुमच्या अंत:करणातील तुमच्या व्यथा जाणतो आणि तुमचं विघ्नं हरतो . देवाला तुमच्या अंत:करणातलं कळतं मग त्याच्याकडे मागायची गरजंच काय? देवाला श्रद्धेने हात जोडल्यास पाहिजे ते मिळून जाते. माझ्या गणपती बाप्पाने, माझ्या आयुष्यातील इच्छाच नव्हेतर अपेक्षाही पूर्ण केल्या आहेत त्याबद्दल त्या बाप्पाला माझं साष्टांग नमन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -