घरमुंबई50 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी सरकारी वकिलास अटक

50 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी सरकारी वकिलास अटक

Subscribe

फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका आरोपीकडून 50 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सरकारी वकिल प्रीती राजाराम जगताप यांना शनिवारी दुपारी लाखलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अंधेरीतील लोकल कोर्टात ही कारवाई झाल्याने तिथे उपस्थित वकिलांसह कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. यातील तक्रारदाराविरुद्ध 2012 साली आंबोली पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्यांची नोंद केली होती.

याच गुन्ह्यांत तक्रारदारासोबत तडजोड करण्यासाठी त्यांनी सरकारी वकिल प्रिती जगताप यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात तडजोड घडवून आणण्यासाठी तसेच कोर्टात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी प्रिती जगताप यांनी त्यांच्याकडून 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय त्यांचे काम करणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे बजाविले होते. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्यांना लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शनिवारी दुपारी या अधिकार्‍यांनी अंधेरीतील लोकल कोर्टात सापळा लावून प्रिती जगताप यांना 50 हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले.

- Advertisement -

कोर्टातच सरकारी वकिलाला लाच घेताना अटक झाल्याचे वृत्त येताच तिथे उपस्थित वकिलांसह कोर्ट कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. प्रिती जगताच या वांद्रे येथील शासकीय वसाहतीत राहत असून अंधेरी कोर्टात सरकारी वकिल म्हणून काम करीत होत्या. अटकेनंतर त्यांच्या राहत्या घरी या अधिकार्‍यांनी कारवाई केली होती, मात्र त्याचा तपशील समजू शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -