घरCORONA UPDATEकोरोना योद्धा डॉक्टरांकडे सरकारचे दुर्लक्ष - एएमसीचा अहवाल

कोरोना योद्धा डॉक्टरांकडे सरकारचे दुर्लक्ष – एएमसीचा अहवाल

Subscribe

कोरोनाविरोधात लढा देताना लागण झालेल्या १७६ डॉक्टरांपैकी अनेकांना सरकारकडून कोणतीही सुविधा मिळाली नसल्याचे उघडकीस आले आहे.

कोरोनाविरोधात लढा देताना लागण झालेल्या १७६ डॉक्टरांपैकी अनेकांना सरकारकडून कोणतीही सुविधा मिळाली नसल्याचे उघडकीस आले आहे. ‘असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट’ (एएमसी) या डॉक्टरांच्या संघटनेकडून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून हे वास्तव पुढे आले आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व खासगी डॉक्टरांना त्यांचे क्लिनिक व हॉस्पिटल सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील अनेक खासगी डॉक्टरांनी आपली हॉस्पिटले व क्लिनिक सुरू केले. तर अनेकांनी सरकारसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका कोरोना योद्धा असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनाही बसला. अनेक कोरोना योद्धांना त्याची लागण झाली. डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याची कारणे शोधण्यासंदर्भात समिती स्थापन करण्यासंदर्भात एएमसीने राज्य सरकारला दोन वेळा पत्र व्यवहार केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर एएमसीने मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या १७६ डॉक्टरांचा सर्व्हे केला. या डॉक्टरांना मे आणि जूनमध्ये कोरोनाची लागण झाली आहे. लागण झालेल्या डॉक्टरांमध्ये ११९ पुरुष तर ५७ महिला डॉक्टर आहेत. यामध्ये २० ते ३५ वयोगटातील डॉक्टरांची संख्या २९ असून, ३६ ते ५० वयोगटातील ७० डॉक्टर आहेत. ५१ ते ६० वयोगटातील ५४, ६१ ते ८० वयोगटातील २३ डॉक्टर आहेत. खासगी हॉस्पिटल किंवा स्वत:च्या क्लिनिकमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या ८० टक्के डॉक्टरांकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे उघडकीस आले. या डॉक्टरांना सरकारकडून कोणत्याही सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत खासगी क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करणार्‍या या डॉक्टरांना राज्य सरकारकडून सरकारी डॉक्टरांसाठी जाहीर केलेली ५० लाखांचा विमा योजनेचा लाभही देण्यात आला नव्हता. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून हे डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत होते. त्यामुळे लागण झालेल्या डॉक्टरांनाही उपचारासाठी एक लाख ७५ हजारांपर्यंत हॉस्पिटलचे बिल भरावे लागल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याचप्रमाणे सरकारसोबत काम करत असलेल्या खासगी डॉक्टरांमधील कोरोनाची लागण झालेल्या २० टक्के म्हणजे १४ डॉक्टरांना क्वारंटाईनची सुविधा नाकारण्यात आली तर अवघ्या दोन डॉक्टरांनाच ही सुविधा दिल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

रुग्ण व नातेवाईकांमुळे डॉक्टरांना लागण

खासगी हॉस्पिटल व क्लिनिकमध्ये कोरोना रुग्णांसह अन्य रुग्णांची सेवा करणार्‍या डॉक्टरांना कोरोनाची लागण ही रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. तपासणीसाठी येत असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे मास्क किंवा कोणत्याही कपड्याने तोंड झाकून घेत नव्हते. तसेच डॉक्टरांशी बोलताना अनेक रुग्ण तोंडावरील मास्क काढत असल्याने डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

सरकारच्या आवाहनानंतर कोरोनामध्ये काम करणार्‍या डॉक्टरांना विमा योजना लागू करणे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे डॉक्टरांसाठी बनवण्यात आलेल्या योजनांमध्ये प्रशासकीय अधिकार्‍यांऐवजी डॉक्टरांच्या विविध संस्थांच्या सदस्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. मात्र त्याऐवजी एखाद्या डॉक्टराच्या सल्ल्यानुसार योजना बनवण्यात आल्याचा फटका अन्य डॉक्टरांना बसतो.
– डॉ. दीपक बैद, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -