घरमहाराष्ट्रनाशिकमनसे निरीक्षकांच्या बैठकीला निम्म्या शाखाध्यक्षांची दांडी

मनसे निरीक्षकांच्या बैठकीला निम्म्या शाखाध्यक्षांची दांडी

Subscribe

राज ठाकरे यांच्या दौर्‍याच्या आधी निरीक्षकांनी घेतला आढावा

नाशिक : येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे. त्याअनुषंगाने त्यांनी संघटना बांधणीकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. याच पार्श्वभूमीवर राज पुढील ३ ते ४ दिवसात नाशिक दौर्‍यावर येत आहेत. त्याआधी शनिवारी (दी.१५) मनसेच्या निरीक्षकांनी नाशकात पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात विभाग अध्यक्ष व शाखाध्यक्ष यांच्याशी बातचीत केली. यावेळी पक्षाची सद्यस्थितीत शहरात काय स्थिति आहे, कामकाज कश्या पद्धतीने सुरू आहे याचा आढावा घेतल्याचे समजते. मात्र, दिवसभर चाललेल्या बैठकीला जवळपास निम्म्या शाखाध्यक्षांनीच दांडी मारली.

एक वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करत स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहरात १२२ शाखाध्यक्षांची नेमणूक केली होती. परंतु शाखाध्यक्षांची क्रिकेट स्पर्धा व्यतिरिक्त हे शाखाध्यक्ष कुठे सक्रिय असल्याचे किंवा त्यांना पक्षाकडून कुठला विशेष कार्यक्रम दिल्याचं दिसून आले नाही. ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्या, परंतु सर्वोच्च न्यायलायाने आदेश दिल्यामुळे येणार्‍या काही महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने मनसेनेही तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्र दौर्‍याला सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाडा, विदर्भ दौरा केल्यानंतर राज पक्षासाठी महत्वाच्या असलेलेल्या नाशिक मध्ये दाखल होणार आहे. तसे संकेत त्यांनी मागील आठवड्यात खाजगी दौर्‍यानिमित्त नाशकात आले असता दिले होते. त्यापूर्वी मनसेच्या निरीक्षकांनी शनिवारी (दी.१५) नाशकातील नेते, पदाधिकारी, विभाग अध्यक्ष, महिला आघाडी, शाखाध्यक्ष यांच्याशी बातचीत करत संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मनसे नेते बाबू वागसकर, सरचिटणीस संदीप देशपांडे, अजय शिंदे व ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव निरीक्षक म्हणून उपस्थित होते. त्याचसोबत माजी महापौर अशोक मूर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, भाऊसाहेब निमसे, सत्यम खंडाळे, निकीतेश धाकराव, संतोष कोरडे, विजय अहिरे, कैलास जाधव, अक्षरा घोडके, कौशल पाटील, संदेश जगताप, गोकुळ नागरे,  जनार्दन खाडे, उदय मुळे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

दत्तक मूल आम्हाला परत द्या : देशपांडे

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीवेळी केलेल्या ‘दत्तक’ विधानावरुन भाजपावर टीकास्त्र सोडले. ‘आम्हाला नाशिक दत्तक द्या म्हणून हे नाशिकच मूल दत्तक घेतलं, दत्तक घेतलेल्या मुलाची आपण स्वताच्या मुळपेक्षा जास्त काळजी घेतो, जास्त लाड करतो, परंतु इथे परिस्थिति उलटी झाली. पाच वर्षात हे मूल बिघडवण्याच काम झाल. त्यामुळे आता ते दत्तक मूल आता आम्हाला परत द्या. म्हणजे ज्या पद्धतीने त्याआधी राज ठाकरे यांनी त्या मुलाचं योग्य संगोपन केल ते पुन्हा होईल अशी लोकांची भावना आहे.’ असा खोचक टोला देशपांडे यांनी लगावला.

मुख्य पदाधिकार्‍यांना विधानसभा निहाय जबाबदारी

शहरातील पदाधिकारी, नेते, शाखाध्यक्ष यांच्याशी चर्चा केल्यानंतर संघटना बांधणी अजून प्रभावी पद्धतीने व्हावी. या दृष्टीकोणातून पक्षातील स्थानिक मुख्य नेत्यांना शहरातील मध्य, पूर्व, पश्चिम मतदारसंघ निहाय जबाबदारी देण्याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते. या जबाबदारया वाटून देत असताना ज्यांच्यावर शहराची जबाबदारी होती अश्या नेत्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे की अंतर्गत शीतयुद्ध व नाराजी शमवण्याच्या अनुषंगाने अशी चाचपणी केली जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -