घरमुंबईदादर रेल्वे स्थानकातील सरकता जिना महिनाभरापासून बंद

दादर रेल्वे स्थानकातील सरकता जिना महिनाभरापासून बंद

Subscribe

वृद्ध, अपंगांसह गरोदर महिला प्रवाशांची गैरसोय

एलफिन्सट रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाने सावध भूमिका घेत रेल्वे स्थानकावरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी सरकत्या जिन्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विविध उपनगरीय रेल्वे स्थानकांत सरकते जिने बसवण्यात आले. मध्य रेल्वेवरील स्थानकांत एकूण ७१ सरकते जिने बसवण्यात आले आहेत. याचा वृद्ध व अपंग प्रवाशांना फायदा झाला आहे. अन्य प्रवाशांकडूनही या जिन्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु, सद्यस्थितीत सर्वाधिक गर्दीचे दादर स्थानकातील फलाट क्रमांक ३ आणि ४ वरील सरकते जिने गेल्या एक महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे वृद्ध,अपंग आणि गरोदर महिलांची गैरसोय झाली आहे.

सरकत्या जिन्यांमुळे रेल्वे स्थानक, प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी कमी वेळात सुरक्षितपणे विभागली जाते. सुरुवातीला कमी प्रमाणात आणि प्रायोगिक स्तरावर सुरू करण्यात आलेली सरकत्या जिन्यांची ही सुविधा अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस पडली. यानंतर या जिन्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, ठाणे, कुर्ला यांसारख्या प्रमुख स्थानकांवर यापूर्वीच सरकते जिने बसवण्यात आले आहेत. परंतु, या स्थानकांवरील गर्दी लक्षात घेऊन दादर, ठाणे स्थानकांत प्रत्येकी चार नवे सरकते जिने बसवण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रवाशांचाही बेजबाबदारपणा
मध्य रेल्वेवरील सरकत्या जिन्यांवर दर मिनिटाला १५० प्रवाशांची तर एकूण तासाला नऊ हजार प्रवाशांची वाहतूक या जिन्यांवरून होते. मात्र चांगल्या सुविधांचे प्रवाशांकडून जितक्या उत्साहात स्वागत होते. तितक्याच बेजबाबदारपणे त्या सुविधांचे नुकसान प्रवाशांकडून केले जाते. दरम्यान, सरकत्या जिन्यावर एखादा अपघात होत असल्यास मदतीसाठी बसवण्यात आलेले आपत्कालीन बटण उपद्व्यापी प्रवाशांकडून अकारण दाबले जात असून त्यामुळे हे सरकते जिने बंद पडत आहे. गेल्या दोन महिन्यांत मध्य रेल्वेवरील १९ स्थानकांतील सरकते जिने २ हजार ८६५ वेळा बंद पडल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातील फलाट चार व पाचवरील सरकता जिना गेल्या ३ महिन्यांत तब्बल १२० वेळा बंद पडला. तर दादर स्थानकातील फलाट क्रमांक तीन व चारवरील कल्याण दिशेला असलेला सरकता जिना गेल्या २ महिन्यांत १६० वेळा बंद पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -