Eco friendly bappa Competition
घर मुंबई मुंबईत मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; काही ठिकाणी झाडे पडली

मुंबईत मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; काही ठिकाणी झाडे पडली

Subscribe

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) थैमान घातले आहे. त्यामुळे हवामानात बदल झाल्यामुळे मुंबईकर दुपारी उन्हामुळे आणि रात्री उकाड्याने हैराण झाले असताना त्यांना मध्यरात्री पडलेल्या पावसाने दिलासा दिला आहे. वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह बुधवारी (12 एप्रिल) मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडली, तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अंधेरीतील मरोळमध्ये जोरदार वाऱ्यामुळे बऱ्याच घरांचे पत्रे उडून गेले आहेत. मुंबई एअपोर्ट परिसरात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

- Advertisement -

अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस पडत असून मागील आठ ते दहा दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे नुकसान झाले असून काढणी केलेला कांदा जागेवरच सडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकरी नेहमीच आस्मानी आणि सुलतानी संकटात भरडला जातो. कांदा पिकांमुळे येणाऱ्या पैशाची आस शेतकऱ्याला लागली होती. या पैश्यातून त्याला मागील नुकसानीची भर निघेल याची अपेक्षा होती आणि पुढील वर्षाचे शेतीची आर्थिक नियोजन देखील या पैश्यातून होणार होते. मात्र नेहमीप्रमाणे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावेळीही बसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी विरोधी पक्षाकडून सरकारकडे मदतीची मागणी होत आहे.

‘या’ जिल्हात अवकाळी पावसाचा जोर वाढणार
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज (13 एप्रिल) कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -