घरमुंबईघ्या...हिमालय पुलाचा ऑडिट रिपोर्ट पाहिलाच नव्हता!

घ्या…हिमालय पुलाचा ऑडिट रिपोर्ट पाहिलाच नव्हता!

Subscribe

संजय दराडेंचा धक्कादायक खुलासा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी पुलाच्या दुघर्टनेसाठी स्ट्रक्चरल ऑडिटरला दोषी ठरवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात या ऑडिटरने दिलेला अहवाल महापालिकेच्या अभियंत्यांनी पाहिलाच नव्हता, अशी धक्कादायक कबुली महापालिका पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली. त्यामुळे पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट कुणासाठी केले जाते, असा सवाल उपस्थित होत आहे.

मुंबई शहरातील परिमंडळ १मधील १२ पादचारी पूल, उड्डाणपूल तसेच ४ भुयारी मार्ग यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मागील स्थायी समितीमध्ये आचारसंहितेमुळे राखून ठेवण्यात आला होता. त्यामुळे पुलांची कामे अत्यावश्यक बाब असल्याचे कारण देत हा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती प्रशासनाने केली. परंतु या प्रस्तावात प्रशासन हिमालय पुलाच्या दुघर्टनेला जबाबदार असलेल्या आणि सध्या अटकेत असलेल्या डि.डि. देसाईज कंपनीच्या शिफारशीनुसार १६ पुलांची दुरुस्ती करण्यात येत आहे, याला सर्वच पक्षांनी तीव्र विरोध करत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रस्तावातून डि.डि. देसाई कंपनीचे नाव वगळून प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी उपसूचनेद्वार केली. त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर करून १६ पुलांच्या कामांसाठी कंत्राटदारांच्या नेमणुकीला मान्यता दिली.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव, सपाचे रईस शेख, भाजपचे अभिजित सामंत, ज्योती अळवणी, आसिफ झकेरिया, राजेश्री शिरवाडकर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी प्रशासनाला फैलावर घेत अशा प्रकारे प्रस्ताव आणलाच कसा, असा सवाल केला. तसेच यापुढे पुलांची नव्हेतर पूल विभागाची दुरुस्ती करावी, असा टोला हाणत हायकोर्टाच्या आदेशानुसार खासगी कंपन्यांऐवजी आयआयटी व व्हीजेटीआय यांसारख्या नामांकित संस्थांच्या मदतीनेच ऑडिट करावे, अशी सूचना केली.

हिमालय पुलाची बांधणी १९८३साली युनायटेड कंपनीच्यावतीने झाली होती, पण तो अर्धवट होता. त्यानंतर १९९२-९३ मध्ये संदीप कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत दुरुस्ती झाली होती, तर २०१३-१४ मध्ये आर.पी. इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीच्यावतीने ७ लाखांचे काम केले गेले. सन २०१६-१७मध्ये विभाग कार्यालयाच्या माध्यमातून पुलाचे काम झाले. परंतु हे काम सल्लागाराच्या देखरेखीखाली होते, त्यामुळे त्यांनी अहवालानुसार काम होते किंवा नाही हे पाहणे अपेक्षित होते, असे संजय दराडे यांनी स्पष्ट केले. मात्र, सप्टेंबर २०१८मध्ये जेव्हा या पुलाचा ऑडिट रिपोर्ट आला होता, तेव्हा तो पाहिलाच नव्हता, असे दराडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -