घरमुंबईसिव्हरेज प्लान्टच्या सर्व्हेक्षण करणाऱ्या अधिकार्‍यांना मारहाण

सिव्हरेज प्लान्टच्या सर्व्हेक्षण करणाऱ्या अधिकार्‍यांना मारहाण

Subscribe

काम बंदचा कामगार सेनेचा इशारा

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत उभारण्यात येणार्‍या मल उदंचन केंद्राच्या (सिव्हरेज प्लान्ट) जागेचे सर्व्हेक्षण करण्यासाठी गेलेल्या केडीएमसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ५ अधिकारी व कर्मचार्‍यांना स्थानिकांनी बुधवारी जबर मारहाण करून हुसकावून लावले. या मारहाणीत महापालिकेच्या नगररचना विभागातील सर्व्हेअर श्रीराम झोपळे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना कल्याणच्या खडकपाडा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पालिकेतील अनुरेखक मधुकर कोल्हे यांच्या हातालाही दुखापत झाली आहे तर उपअभियंता राजू सगर आणि मजीप्राचे शाख्यवंशी, धर्मेद्र यादव यांनाही किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, पालिका अधिकार्‍यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने निषेध केला आहे. या घटनेतील संबंधित आरोपींवर कडक कारवाई न केल्यास गुरूवारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष रवी पाटील यांनी दिला आहे.

- Advertisement -

केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत उंबर्डे गावात मल उदंचन (सिव्हरेज प्लान्ट) केंद्र उभारण्यात येणार आहे. त्या जागेचे सर्व्हेक्षण करण्यासाठी पालिका व मजीप्राचे अधिकारी व कर्मचारी गेले होते. त्यावेळी स्थानिक ८ ते १० अनोळखी व्यक्तींनी ही जागा आमची आहे, असे सांगून सर्व्हेक्षण करण्यास विरोध दर्शविला. सदर जागा ही महापालिकेच्या नावावर असल्याचे अधिकार्‍यांनी समजावताच त्यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली, अशी माहिती जखमी मधुकर कोल्हे यांनी दिली. स्थानिकांनी पाच जणांना मारहाण केली. सर्व्हेअर श्रीराम झोपळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र हा प्रकार समजताच पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -