मुंबईला करोनामुक्त ठेवण्यासाठी राबतेय डॉक्टर-कर्मचाऱ्यांची भली मोठी टीम!

मुंबईसह महाराष्ट्राचा करोनाविरोधातला लढा सुरू असताना या लढ्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांची मोठी टीम यासाठी काम करत आहे.

kasturba hospital

करोना व्हायरसमुळे वेगवेगळ्या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांची संख्या धिम्या गतीने वाढत असताना महाराष्ट्रात संसर्गातून व्हायरस पसरण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे, ही बाब दिलासादायक जरी असली तरी महाराष्ट्रात सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. पण, करोनाचा संसर्ग राज्यासह मुंबईत मोठ्या प्रमाणात पसरू नये, यासाठी अनेक हात वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार अनेक निर्णय घेऊन संसर्ग कसा रोखता येईल यासाठी प्रयत्नशील आहे.

२४ तास राबतात आरोग्य कर्मचारी

करोनाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक यंत्रणा कामाला लागल्या आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभाग, महापालिका आरोग्य विभाग, एअरपोर्ट अधिकारी, वाहतूक विभाग, पोलीस विभाग, समाजकल्याण विभाग, महसूल विभाग, अर्थ विभाग हे वेगवेगळे विभाग यात सहभागी झाले आहेत. करोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून मुंबईतील पालिकेच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसह पॅरावैद्यकीय कर्मचारी दिवस-रात्र रुग्णांच्या सेवेत आहेत. यापैकी अनेकांचे हात सतत रुग्णांसाठी राबत आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांच्या हॉस्पिटलमधील उप संचालक, सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तिथले सर्व वैद्यकीय अधिकारी जिल्हा पातळीवर काम करत आहेत. जिथे वैद्यकीय महाविद्यालये उपलब्ध आहेत तिथे उपचार केले जात असून तिथले सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी काम करत आहेत. दिवसरात्र आळीपाळीने २४ तास येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्या आणि त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. महाराष्ट्रासह मुंबईतील डॉक्टर्स २४ तास काम करत आहेत.

मुंबई विमानतळावर १३५ डॉक्टर्सची टीम

पालिकेच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा चमू विमानतळावर कार्यरत असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग करत आहे. पालिकेच्या वतीने सध्या मुंबई विमानतळावर १३५ डॉक्टर्स आणि ८० पॅरावैद्यकीय कर्मचारी आहेत. सध्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये करोनासाठी बाह्यरुग्ण विभागात तीन पाळ्यांमध्ये काम सुरू आहे. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये फक्त करोनाच्या उपचारांसाठी आळीपाळीने २४ डॉक्टर्स, २४ नर्सेस, ३० चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत. आयसोलेशन वॉर्डमध्ये १२ डॉक्टर्स, सात परिचारिका आणि सात इतर सहाय्यक कर्मचारी आहेत. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये करोनाविषयक वैद्यकीय प्रयोगशाळा असल्याने या ठिकाणी पाच वैद्यकीय तज्ज्ञ नमुन्यांची तपासणी करून अहवाल देत आहेत. एवढीच यंत्रणा बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये काम करत आहे. संसर्गजन्य परिसरांतून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्या करुन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. तर, जे लोक संशयित आहेत त्यांना क्वॉरंटाईन केले जात असून १४ दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे.

कस्तुरबामध्ये आत्तापर्यंत ३ हजार ६८२ नमुन्यांची चाचणी

सध्या नागपूर, पुणे आणि मुंबई या तिन्ही ठिकाणी सर्व तपासणी आणि उपचारांची सुविधा केली गेली आहे. जिल्हा हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये काही ठिकाणी आयसोलेशन वॉर्ड (विलगीकरण कक्ष) ची सुविधा करुन देण्यात आली आहे. कस्तुरबामध्ये एखादा रुग्ण जर पॉझिटिव्ह आला तर त्याला विलगीकरण कक्षात ठेवलं जातं. त्यानंतर त्याच्यावर लक्षणांनुसार उपचार केले जात आहेत. कस्तुरबा हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज ३०० ते ३५० रुग्णांची नोंद केली जात आहे. या ओपीडीला नियंत्रण करण्यासाठी पोलीस यंत्रणाही सहाय्य करत आहेत. आतापर्यंत ३ हजार ६८२ जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत.

कस्तुरबातील विलगीकरण कक्षातही रुग्णांना बऱ्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यात वायफाय सेवा, जेवण, वृत्तपत्र, टीव्ही अशा सुविधा आहेत. त्यांच्यासाठीही पालिकेचे कर्मचारी काम करत आहेत. आरोग्य केंद्रातील २०८ कर्मचारी, त्यासोबत रुग्णांचा शोध घेण्यासाठी तीन ते साडेतीन हजार आरोग्य सेविका कार्यरत आहेत.

डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका आरोग्य विभाग


हेही वाचा – आता ३१ मार्च नव्हे, पुढील आदेश येईपर्यंत सध्याचे निर्णय लागू, अजित पवारांची घोषणा!