घरCORONA UPDATELockDown: उल्हासनगरमध्ये पोलिसांसमोरच सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

LockDown: उल्हासनगरमध्ये पोलिसांसमोरच सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

Subscribe

उल्हासनगर वाहतूक पोलीस शाखा आणि काही सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने रूट मार्च काढण्यात आला होता. मात्र हा रूट मार्च पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी गर्दी केली.

उल्हासनगर वाहतूक पोलीस शाखा आणि काही सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने रूट मार्च काढण्यात आला होता. या रूट मार्चद्वारे शहरातील नागरिकांची कोरोनाबाबत जनजागृती करणे हा उद्देश होता. मात्र हा रूट मार्च पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी गर्दी केली. त्यातल्या त्यात सामाजिक संघटनांनी सत्काराचा कार्यक्रम ठेऊन आणखी गोंधळ घालता. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पोलीस प्रशासनासमोर धिंडवडे उडवले गेले.

काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उल्हासनगर वाहतूक शाखा, सिंधू सखा संगम, सिंधू एज्युकेशन सोसायटी यांच्यामार्फत कोरोना वॉरिअर्सला सलामी देण्यासाठी उल्हासनगर – १ येथील शहाड फाटक ते गोल मैदान असा रूट मार्च काढण्यात आला होता. यावेळी उल्हासनगर वाहतूक पोलीस शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डी. डी. टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे, अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोकांनी या रूट मार्चचे स्वागत केले काहींनी इमारतींमधून पोलीस कर्मचाऱ्यांवर पुष्पवर्षाव केला. मात्र या रूट मार्चला पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली. अनेक लोकं मास्क न घालता उभे होते. सोशल डिस्टनन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात होते. पोलीस प्रशासना समोर हा प्रकार घडत होता. लोकांना समज देण्याचा प्रयत्न पोलीस आणि सामाजिक संघटनांच्या स्वयंसेवकांनी केला. मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

- Advertisement -

दुसरीकडे लोकांची जनजागृती करण्यापेक्षा सामाजिक संघटनांनी या कार्यक्रमाला इव्हेंटचे स्वरूप दिले होते. एका वाहनात स्पीकर्स, मेगासक्रीन, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी, सूचना देणारे स्वयंसेवक ठिकठिकाणी दिसत होते. कार्यक्रमाचा समारोप गोल मैदान येथे करण्यात आला. या ठिकाणी अमृतवेला ट्रस्ट, झुलेलाल ट्रस्ट, राधास्वामी सत्संग या धार्मिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे, मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर आणि अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात तर अधिकच गर्दी आणि गोंधळ झाला होता. काही अतिउत्साही लोकं सेल्फीदेखील काढत होते. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पोलिसांनी खूप प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले. एकीकडे मास्क न घालणाऱ्या लोकांना, विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पोलिसांकडून उठबस करायला लावली जाते. वाहन चालकांची वाहने जप्त केली जातात. तर दुसरीकडे पोलिसांमुळेच अशा प्रकारची गर्दी होताना दिसते. दरम्यान, या रूट मार्चच्या कार्यक्रमामुळे पोलीस प्रशासनावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोना विषाणूचं औषध पहिल्या चाचणीत अयशस्वी; अहवाल झाला लीक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -