घरमुंबईअपक्ष आणि भाजपचे १५ आमदार संपर्कात

अपक्ष आणि भाजपचे १५ आमदार संपर्कात

Subscribe

जयंत पाटील यांचा दावा

भाजपत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि काही अपक्ष आमदार असे एकूण १५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मेगा भरती करणार नाही, आमदारांना मेरिटवरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर समितीची बैठक रविवारी पुण्यात झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी हा खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ इच्छिणार्‍या आमदारांचे नाव मी उघड करणार नाही. त्यामुळे ते अडचणीत येतील. मात्र आमच्या कार्यकर्त्यांना आणि आमदारांना विचारल्याशिवाय या आमदारांना पक्षात प्रवेश देण्यात येणार नाही. भाजपत गेलेले राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि अपक्ष आमदारांनाही राष्ट्रवादीत यायचे आहे, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, असे जयंत पाटील यांनी सांगितले. सरकार स्थापनेबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत.

- Advertisement -

जनतेच्या मनातले आणि पाच वर्षे टिकेल असे सरकार द्यायचे आहे. तसे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करत आहेत. त्यामुळे थोडा वेळ जातोय; पण स्थिर आणि मजबूत सरकार नक्कीच दिले जाईल. आम्ही भाजपला विचाराने पराभूत केले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र दगडापेक्षा वीट मऊ असल्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत जात आहोत, असेही पाटील यांनी सांगितले. आजच्या कोअर समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातील नेत्यांना बोलावण्यात आले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला आहे. मात्र हा मसुदा अंतिम नाही. तिन्ही पक्षाचे नेते दिल्लीत एकत्रित बैठक करून या मसुद्यावर अंतिम निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. सध्या तिन्ही पक्षांची चर्चा प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे घटक पक्षांना चर्चेसाठी बोलावलेले नाही. जेव्हा विचाराची प्रक्रिया सुरू होईल, तेव्हा घटक पक्षांना बोलावले जाईल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

आज सोनिया-पवार भेट

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील सत्ताकोंडीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर मंगळवारी राज्यातील दोन्ही काँग्रेसचे नेते एकत्र बसून पर्यायी सरकार निर्माण करण्यावर भर देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -