घरमुंबईटेकफेस्टमध्ये तंत्रज्ञानाचा अविष्कार

टेकफेस्टमध्ये तंत्रज्ञानाचा अविष्कार

Subscribe

आयआयटी मुंबईचे टेकफेस्ट म्हणजे तंत्रज्ञानप्रिय व्यक्ती व विद्यार्थ्यांसाठी एक प्रकारची पर्वणीच असते. विज्ञान व तंत्रज्ञानला प्राधान्य देणार्‍या टेकफेस्टमध्ये जपान, स्विडन, जर्मनी, रशिया, नेदरलँड यासारख्या देशातील रोबो पाहण्यासाठी शालेय, महाविद्यालयनी विद्यार्थ्यांसह तंत्रज्ञान प्रेमींनी गर्दी केली होती. जगभरातील विद्यार्थी व कंपन्यांनी बनवलेले रोबो पाहून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी भारावून गेले होते. त्यामुळे आयआयटीच्या कम्पाऊंडमध्ये सर्वत्र भारावलेले वातावरण पाहायला मिळत होते.

भारतीय रोबोंना तंत्रज्ञानप्रेमींची पसंती
आयआयटी मुंबईच्या के.व्ही. ग्राऊंडवर भरवलेल्या प्रदर्शनात जगातील सर्व रोबो मांडण्यात आले होते. त्यामध्ये अमेरिका, रशिया, जर्मनी, नेदरलँड, स्वीडन यासारख्या देशातील विद्यार्थ्यांनी बनवलेले रोबो सर्वांचे लक्ष वेधून घेत असले तरी भारतीय रोबोंना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. भारतीय कंपनी सिरेनने मांडलेल्या ‘निनो’ हा रोबो सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होता. लहान मुलांना छोट्या छोट्या स्वरुपात शिक्षण देणारा तसेच अभ्यास करून त्यांना कंटाळा आल्यावर डान्स करून त्यांचे मनोरंजन करणारा निनो शालेय मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. त्याचबरोबर ‘निनो’ आवाजावर नियंत्रित होत असल्याने विद्यार्थी तो नियंत्रित करण्याचा प्रयत्नही करत होते. त्याचप्रमाणे घरगुती कामे व घराच्या सुरक्षेसाठी प्रदर्शनात ठेवण्यात आलेला ‘इंड्रो 3.0’ हा रोबो पाहण्यासाठी ही प्रंचड गर्दी होत होती. हा रोबो 4.5 फूट उंच असल्याने अनेक विद्यार्थी त्याच्यासोबत सेल्फी काढत होते.

- Advertisement -

शारीरिक क्षमता वाढवणारे मशीन
नेदरलँडमधील कंपनी असलेल्या परंतु सुरतमधील तरुणाकडून सादर करण्यात आलेला स्केलेक्स 360 हे मशीनही अनेकांसाठी आकर्षण ठरत होते. हे मशीन अंगावर चढवल्याने शारीरिक क्षमता वाढून माणूस स्वत:च्या क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलण्यासाठी सक्षम होत असे. त्यामुळे हे मशीन अंगावर चढवून पाहण्यासाठी अनेक तरुण-तरुणींची झुंबड उडत होती.

बोलक्या रोबोंसोबत सेल्फीसाठी चढाओढ
स्वीडनमधील फरहत रोबो हा अत्याधुनिक सोशल रोबो या प्रदर्शनात मांडला होता. फरहत रोबो हा मनुष्याच्या चेहर्‍यावरील हावभावानुसार स्वत:चेही भाव बदलत होता. तसेच तो डोळ्याने समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधत होता. सोशल रोबोटिकमधील महत्त्वाचा असलेला फरहत रोबो पाहण्यासाठीही गर्दी उसळली होती. हा रोबो मनुष्याप्रमाणे बोलत असून, तो समोरच्या व्यक्तीशी संवादही साधत होता. जपानच्या तंत्रज्ञांनी बनविलेला ‘ऍण्ड्रॉईड यू’ हा मानवासारखा दिसणारा रोबो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. एखाद्या महिलेप्रमाणे हुबेहूब बनविण्यात आलेला हा रोबो, माणसांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांला सहजपणे उत्तर देत होता. या रोबोसोबत सेल्फी घेण्यासाठी दर्शकांनी गर्दी केली होती.

- Advertisement -

रोबोवॉरचा जल्लोष
रोबोवॉर हे दरवर्षी टेकफेस्टचे खास आकर्षण असते. यावर्षीही टेकफेस्टमध्ये रोबोवॉर पाहण्यासाठी तरुणांची झुंबड उडाली होती. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या रोबोवॉरमध्ये अनेक सामने चुरशीचे झाले. मात्र सलग दोन वर्ष विजेता असलेला ग्रेट गॅमा व अंडरडॉग या नावाप्रमाणेच बलाढ्य असलेल्या रोबोमधी लढत चुरशीची झाली. ग्रेट गॅमा रोबोने सुरुवातीपासूनच अंडरडॉगवर आक्रमण केले. तर अंडरडॉग याने ही त्या आक्रमणाला सडेतोड उत्तर दिले. परंतु गुणांच्या स्पर्धेत आघाडीवर असलेला ग्रेट गॅमा मात्र अचानक बंद पडल्याने निर्णय अंडरडॉगला विजयी घोषीत करण्यात आले.

विमान व जहाज अपघातानंतर समुद्रात बुडालेले अवशेष, व्यक्ती किंवा विमानाचा ब्लॅक बॅक्स शोधण्यासाठी आयआयटी मुंबईच्या 40 विद्यार्थ्यांनी पाण्याखाली कार्य करणारे ‘मत्स’ हे विशेष वाहन तयार केले आहे. हे यंत्र पाण्याच्या तळाशी जाऊन आवश्यक वस्तूचा शोध घेऊ शकते. या यंत्रातील कॅमेर्‍यांमुळे पाण्याखालील वस्तूंची पाहणीही करता येते. हे यंत्र फिजिक्स पार्किंग मैदानातील प्रदर्शनात मांडण्यात आले आहे.

तीस हजार जणांनी अनुभवला टेक फेस्ट
आयआयटी मुंबईच्या टेक फेटच्या पहिल्या दिवशी तब्बल तीस हजार जणांनी टेक फेस्टला भेट दिली. तीन दिवस चालणार्‍या फेस्टमध्ये देश विदेशातील तंत्रज्ञ, विद्यार्थी सहभागी होणार असून ते आपले प्रकल्प येथे सादर करणार आहेत. पहिली दिवशी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -