घरमुंबईकोण संरक्षण देत आहे? मविआ काळातील तक्रारीबद्दल जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांना जाब

कोण संरक्षण देत आहे? मविआ काळातील तक्रारीबद्दल जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांना जाब

Subscribe

हा घोटाळा त्यांच्याच मविआ सरकार काळात घडला असल्यानंतर जितेंद्र आव्हाडांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे.

राज्यातील सत्ताबदलानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने त्यांचा बालेकिल्ला असणारा ठाणे जिल्हा ‘सत्ताकेंद्र’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. याच ठाण्यात आता राजकीय संघर्षही सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर हा संघर्ष मात्र आणखी वाढला आहे. अशात जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील एका घरकुल घोटाळ्याबाबत ‘या पत्राची दखल कोण घेणार?’ असा सवाल उपस्थित केलाय. विशेष म्हणजे, या घोटाळ्याबाबतची तक्रार त्यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातच झाला असल्याने आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय.

मुंब्र्याचे आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पत्र शेअर केलंय. एमएमआरडीए घरकुल घोटाळा प्रकरणाबाबतचे हे पत्र आहे. ठाण्यातील घरकुल घोटाळा प्रकरणात योग्य चौकशीची मागणी या पत्रातून करण्यात आलीय. ठाण्यातील काँग्रसचे नगरसेवक अॅड. विक्रांत चव्हाण यांच्या लेटरहेडवरील हे पत्र आहे. “या पत्राची दखल कोण घेणार… हे सगळे विचारात घेऊन चौकशी केली असती तर इतका माजला नसता… इतकं सगळं होऊन कुठली चौकशी नाही, कोण संरक्षण देत आहे? कोण वाचवते आहे…” अशी विचारणा त्यांनी या पोस्टद्वारे केली आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांच्या या पोस्टवरून आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण येण्यामागचं कारण म्हणजे घरकुल घोटाळ्याचे प्रकरण त्यांच्याच महाविकास आघाडी सरकारच्या काळात समोर आले असून त्याचसंदर्भात काँग्रेसचे हे पत्र आहे. त्यामुळे त्यांच्याच मविआ सरकार काळात घडलेल्य़ा या प्रकाराच्या चौकशीबाबत जितेंद्र आव्हाडांनी सवाल उपस्थित केले आहेत.
ठाण्यातील मुंब्रा व शिळ डायघर पोलीस स्टेशन हद्दीतील हे एमएमआरडीए घरकुल घोटाळा प्रकरण आहे. मुंब्रा आणि शिळ डायघर पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. झोपडपट्टीवासींना पक्की घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जवळपास २ कोटी ४० लाख रुपये एका तथाकथित स्वयंसेवी संस्थेने गोळा केल्याचा प्रकार उघड झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या घोटाळ्यासाठी ठाणे महापालिकेचे नाव आणि बोधचिन्हाचाही वापर झाला असल्याचे अॅड. विक्रांत चव्हाण यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

या घोटाळ्यात काही राजकीय नेत्यांचे हितसंबंध गुंतल्याचीही चर्चा सुरू होती. ‘एमएमआरडीए’मार्फत ठाणे महापालिकेला दिवा येथील दोस्ती रेंटलमध्ये सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात मूळ लाभार्थ्यांऐवजी इतरांना सदनिका देताना खोटे दस्तऐवज, ताबा पावती, बायोमेट्रीक सर्व्हे, बनावट कॉम्प्युटर चाव्यांचा घोळ घातला आहे, असा दावाही करण्यात येतो. यामध्ये ठाणे महापालिकेच्या अधिकार्‍यांचा सहभाग असल्यामुळे अशाप्रकारे गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या प्रकरणात महापालिका अधिकार्‍यांची व काही लोकप्रतिनिधींची चौकशी ‘सीआयडी’मार्फत करावी, अशी मागणी मविआ सरकार काळातील तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. परंतु त्यानंतर या प्रकरणात काही हालचाली झालेल्या दिसल्या नाहीत. मात्र राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर या घोटाळ्यावरून आताचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -