घरमुंबईबांधकामांमुळे कल्याण डोंबिवलीत ‘स्मार्ट’ प्रदुषण

बांधकामांमुळे कल्याण डोंबिवलीत ‘स्मार्ट’ प्रदुषण

Subscribe

कल्याण डोंबिवली शहरात वृक्षतोड, जमिनीची धूप, माती नष्ट होऊन सिमेंटची जंगले वाढत आहेत. त्यामुळे पर्यावरणावर ताण पडत आहे. तसेच शहरालगतच्या खारफुटीच्या जागेत भराव टाकून बांधकामे करण्यात येत असल्याने त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. हे वास्तव केडीएमसीच्या पर्यावरण अहवालातून उजेडात आले आहे. कल्याण डोंबिवलीला मोठ्या प्रमाणात खाडी किनारा लाभला आहे. मात्र खाडी किनारी खारफुटीच्या झाडांची कत्तल करून त्यावर मातीची भरणी करून बेकायदा बांधकामे मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्रकार ‘आपलं महानगर’ने बातमीच्या माध्यमातून समोर आणला होता.

कल्याण डोंबिवली शहर हे स्मार्ट सिटी शहरात समावेश झाला असला तरीही बेकायदा बांधकामची समस्या मोठी आहे. महापालिकेचे क्षेत्र तिन्ही बाजूनी खाडीने वेढलेले आहे. सीआरझेड झोन केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने त्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्र, राज्य व महापालिका यांनी समन्वयाने खाडी संलग्न परिसराचे संवर्धन करणे गरजेचे आहे. मात्र खाडी किनारी मोठी मोठी बेकायदा बांधकामे होत आहेत. मात्र या बांधकामांकडे महापालिका व तहसील कार्यालयाकडून नेहमीच कानाडोळा होत असल्याचे समोर आले आहे. कल्याण डोंबिवली लगतच्या खारफुटीच्या जागेत भराव टाकून बांधकामे करण्यात येत असल्याने त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे.

- Advertisement -

केडीएमसीच्या पर्यावरण अहवालात वायू प्रदूषणाची समस्या समोर आली आहे. कल्याणातील शिवाजी चौक व कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वायू प्रदूषण अधिक असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. वाहने, कारखाने आणि चालू असलेली बांधकामे यामुळे सल्फर डायॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, धुलीकण इत्यादी प्रदूषके हवेत मिसळल्याने त्याचा जनतेच्या आरोग्यास हानीकारक ठरतात. शहरात वाहनांमुळे आणि कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याचे समोर आले आहे. प्रदूषण तपासणीसाठी सात ठिकाणांची निवड करण्यात आली. त्यामध्ये आधारवाडी क्षेपणभूमी, शिवाजी चौक, डोंबिवली विभागीय कार्यालय, रामबाग, कल्याण रेल्वे स्टेशन, फडके रोड, शहाड, जकात नाका या ठिकाणांचा समावेश होता.

महापालिका क्षेत्रात चालू असलेली विविध विकासकामे, मुख्य रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण यामुळे सूक्ष्म धूलीकण, प्रदूषक निर्माण होत आहेत. या धुलीकणांचा नागरिकांच्या आरोग्यावर होणार्‍या दुष्परिणामांना रोखण्यासाठी सफाई कामगारांसोबातच यांत्रिकी उपकरणांचा प्रभावी वापर करण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषणाचा प्रश्न हाताळण्यासाठी महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने वायू प्रदूषणमुक्त असलेल्या बसेस आपल्या ताफ्यात समाविष्ट केलेल्या आहेत. दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या वाढत असून पुढील 15 वर्षात वाढत्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे त्यांचे पार्किंग व त्याद्वारे होणार्‍या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

घनकचर्‍याची समस्या गंभीर
केडीएमसी क्षेत्रातील लोकसंख्या 15 लाखांपेक्षा आहे. घनकचरा व त्याची विल्हेवाट लावण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही समस्या पर्यावरण अहवालातही प्रकर्षाने नमूद करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात प्रतिदिन 650 टन घनकचरा निर्माण होतो. म्हणजेच प्रतिदिन दरडोई 430 ग्रॅम कचरा निर्माण होतोय. हे प्रमाण इतर समान शहरांच्या तुलनेत सुमारे 37 टक्क्यांनी अधिक आहे. आधारवाडी क्षेपणभूमी बंद करण्यासाठी 8 वेळा निविदा मागवूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे या अहवालातून समोर आले आहे. घनकचरा व्यवस्थापन समस्येला तोंड देण्यासाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा दिला पाहिजे. परंतु त्याला म्हणावे तसे यश आलेले नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

डोंबिवलीतील प्रदुषणाच्या मोजणीला बगल
महापालिका क्षेत्रातील 7 ठिकाणांच्या हवेचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. हवेत तरंगणारे अतिसूक्ष्म धूलिकण आरएसपीएम वगळता सर्व परिमाणे ही नॅशनल आंम्बीयंट एअर क्वालिटी स्टँडर्ड (एनएक्यूएस) ने आखून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहेत. आधारवाडी, शिवाजी चौक, कल्याण रेल्वे स्टेशन, डोंबिवली विभागीय कार्यालय, शहाड जकात नाका, रामबाग, फडके रोड येथील हवेतील वायू प्रदूषण गत वर्षाच्या तुलनेत कमी-जास्त झालेले असून, इतर ठिकाणांच्या तुलनेत शिवाजी चौक व कल्याण रेल्वे स्टेशन येथे वार्षिक वायू प्रदूषण जास्त झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात रासायिनक कंपन्यांमुळे मोठया प्रमाणात प्रदूषण होत आहे. डोंबिवली हे प्रदुषित शहर म्हणूनही गणना झाली होती. मात्र त्या परिसरातील प्रदुषणाची मोजणीत बगल देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -