घरमुंबईगैरसोयीच्या भाजी मंडई पडल्या ओस; विक्रेते, ग्राहक फिरकेना!

गैरसोयीच्या भाजी मंडई पडल्या ओस; विक्रेते, ग्राहक फिरकेना!

Subscribe

रस्त्यावरच भाजी विक्रेत्यांचे ठाण...फेरीवाल्यांचा प्रश्न सुटणार कसा ?

कल्याण डोंबिवली महापालिकेने बांधलेल्या भाजी मंडई गैरसोयीच्या ठरत असल्याने त्या ठिकाणी भाजी विक्रेते आणि ग्राहकही फिरकत नसल्याने त्या ओस पडल्या आहेत. त्यामुळे एकिकडे भाजी विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने त्यांच्याकडूनच ग्राहकही खरेदी करीत आहेत तर दुसरीकडे पालिकेने भाजी मंडई बांधण्यासाठी केलेला कोटयावधी रूपये खर्च वाया गेल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यावरील फेरीवाल्यांची समस्या कशी सुटणार? असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित हेात आहे.

रेल्वे स्थानकातील दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आहेत. मात्र कल्याण डोंबिवली परिसरात रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा विळखा पडल्याचे दिसून येते. मागील आठवडयात बसण्याच्या जागेवरी फेरीवाल्यांमधील हाणामारीचा प्रकार सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर फेरीवाल्यांच्या कारवाईचा प्रश्न चव्हाटयावर आला. अखेर पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम उघडली. महापालिका आयुक्त गोविंद बोडके स्वत: रस्त्यावर उतरले, पण त्यांची पाठ फिरताच परिस्थिती जैसे थे आहे. फेरीवाल्यांच्या प्रश्नानंतर आता शहरातील भाजी मंडईचा विषयही चर्चेला आला आहे. डोंबिवली पश्चिमेला एकही भाजीमंडई नाही. पूर्वेला उर्सेकरवाडीत भाजीमंडई आहे, मात्र ती छोटी असून त्या ठिकाणी जाण्यासाठी फेरीवाल्यांचा अडथळा असतो. तसेच तेथील भाजी तुलनेने महागडी असल्याने सर्वसामान्य ग्राहक या मंडईत फिरकत नाहीत तसेच कल्याण भागातही सुसज्ज अशी भाजी मंडई नाही. कल्याण पूर्व आणि पश्चिमेलाही तीच स्थिती आहे. महापालिका हद्दीत सुसज्ज भाजीमंडई नसल्याने या शहरांमध्ये जागा मिळेल तिथे भाजीविक्रेते ठाण मांडतात.

- Advertisement -

रहिवाशांच्या पत्रव्यवहाराकडे पालिकेचे दुर्लक्ष

डोंबिवलीमध्येही पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरात चिमणी गल्ली परिसरात भाजीविक्रेते वर्षानुवर्षे रस्त्यावर व्यवसाय करतात. अनेकदा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईला त्यांना सामोरे जावे लागते. महापालिकेच्या सर्वच प्रभागांत हातगाडी विक्रेते, गाळ्यांमध्ये भाजीविक्री केली जाते. कल्याण पश्चिमेला रेल्वेस्थानकानजीक नाशिक, पुणे, नवी मुंबई भागातून येणाऱ्या होलसेल भाजीविक्रेत्यांसाठी व्यवस्था आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. मात्र त्याठिकाणी सर्वसामान्य नागरिक रोज जातील आणि भाजी घेऊ शकतील हे शक्य होत नाही. तेथे महापालिका क्षेत्रासह बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आदी ठिकाणचे हॉटेल व्यावसायिक, कॅण्टीन व्यावसायिक, पोळी-भाजी विक्रेते आदींची पहाटेपासून रीघ लागते. रस्त्यांवर भाजीविक्री केली जात असल्याने उडणारा धूरळा आणि कचरा भाज्यांवर बसतो. त्यामुळे या भागात सुसज्ज मंडई बांधण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने उभारलेल्या वास्तू ओस पडल्या आहेत. मात्र या रिकाम्या वास्तूंमध्ये उपद्रवींचा वावर वाढला आहे. महापालिकेच्या अखत्यारीत वास्तूंमध्ये भाजीमंडईसाठीही काही ठिकाणी जागा राखीव आहेत. त्यापैकी ठाकुर्ली आणि डोंबिवलीतील नेहरू रोडला एकमजली भाजीमंडई अनेक वर्षांपासून धूळखात पडल्या आहेत. वापराअभावी तेथे उपद्रवींचा वावर वाढला आहे. परिसरातील रहिवाश्यांनी यासंदर्भात महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केले. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

इथे बसतात फेरीवाले …

डोंबिवली पूर्वेला फडके रोड, टाटा लेन, शिवमंदिर रोड, गोग्रासवाडी, नामदेव पथ, गांधीनगर, पी अँड टी कॉलनी, स्टार कॉलनी, ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसर, कांचनगाव, एमआयडीसी निवासी विभागातील मिलापनगर, नांदिवली चौक, तर पश्चिमेला उमेशनगर, दिनदयाळ रस्त्यावर सम्राट चौक, गरिबाचा वाडा, कुंभारखण पाडा, नवापाडा, महात्मा फुले रोड, कोपर रोड, राजूनगर, आदी भागांमध्ये रस्त्यांवर भाजीविक्रेते आढळून येतात. उमेशनगर येथे रेतीबंदर रोडला रविवारी मोठा बाजार भरतो. बुधवारीही घनश्याम गप्ते रस्त्यावर आठवडी बाजार भरतो.

पूर्वेला सोमवारचा बाजार मानपाडा रोडला भरतो. आठवडा बाजारात भाजीविक्रेत्यांचे प्रमाण फारसे नसते. कल्याणला टिळकचौक, पारनाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खडकपाडा, स्थानक परिसर, जरीमरी नाका, कोळसेवाडी, वालधुनी, सम्राट चौक, विठ्ठलवाडी आदी परिसरात ठिकठिकाणी भाजीविक्रेते रस्त्याच्या दुतर्फा बसतात. हातगाडीवर भाजी घेऊन शहराच्या विविध भागांमध्ये सकाळच्या वेळेत भाजीविक्रेते जातात. त्यांच्याकडूनच भाजी खरेदी केली जात आहे. गोळवली पेट्रोलपंपनजीकचा परिसर, पलावा, काटई परिसर आणि बदलापूर पाईपलाईन रस्त्याच्या दुतर्फा, तसेच अन्य काही भागांत किरकोळ विक्रेते व्यवसाय करतात.


​कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या १३०० जादा बसेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -