घरमुंबईमुंबई, ठाणे, परळी वगळून आज ‘महाराष्ट्र बंद’

मुंबई, ठाणे, परळी वगळून आज ‘महाराष्ट्र बंद’

Subscribe

या बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळी ही चार शहरे वगळण्यात आली आहेत. या चारही ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांच्या दरम्यान झालेल्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे.

गेली दोन वर्षे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, या बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळी ही चार शहरे वगळण्यात आली आहेत. या चारही ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांच्या दरम्यान झालेल्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. सतत अन्य लोकांना वेठीस धरणे योग्य नाही, म्हणून या चारही प्रमुख शहरांना वगळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आंदोलकांनी केवळ ठिय्या आंदोलन या शहरांमध्ये करण्याचे ठरवले आहे.

गेले २१ दिवस रोज आंदोलन
राज्यात गेले २१ दिवस रोज मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान ठिकठिकाणी हिंसक वळण लागून मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या आंदोलनाने अनेक लोक वेठीला धरले जात असल्याचे चित्र होते, मात्र उद्या ठिय्या आंदोलन करण्याची जरी आंदोलकांनी तयारी दर्शवली असली तरीही पोलिसांचा राज्यभर मोठा बंदोबस्त असणार असल्याची माहिती आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, लातूर, रायगड, औरंगाबाद आणि राज्यभर अनेक ठिकाणी पोलिसांचा कडा पहारा असणार आहे. तर संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी हे आंदोलन शांततेत पार पाडण्याचे आवाहन सर्व आंदोलकांना केले आहे.

- Advertisement -

अनेक अफवा पसरत आहेत
सोशल मीडियावरून महाराष्ट्र बंदसंदर्भात अनेक अफवा आणि मेसेज पसरत आहेत. ‘मुंबईत मॉलपासून ते सर्व वाहतूक बंद असेल’ अशा स्वरुपाचे मेसेज पसरत असून या केवळ अफवा असल्याचे सकल मराठा समाजाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात काळ्या फिती लावून ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय सकल मराठा समाजाने बैठकीत घेतला असून जे ठिय्या आंदोलनात उपस्थित राहू शकणार नाही त्यांनी आपापल्या ऑफिसमध्ये काळ्या फिती लावून जाणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कशी आहे महाराष्ट्र बंदची आचारसंहिता?

  • बंद हा शांततेच्या मार्गाने असला पाहिजे
  • बंदमध्ये कोणत्याही शासकीय वा खाजगी मालमत्तेची तोडफोड अथवा मोडतोड करू नये
  • प्रत्येक ठिकाणातील मराठा समाजाने आपापले विभाग कडकडीत बंद करायचे आहे
  • बंद २४ तास असेल
  • कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आपली जबाबदारी आहे
  • पोलीस प्रशासनला सहकार्य करायचे आहे
  • बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत
  • सोशल मीडियावरच्या बातम्यांची खातरजमा करायची आहे
  • अफवांवर विश्वास ठेवू नका
  • मराठा सेवकांनी शांत राहून अ‍ॅक्शन प्लॅन तयार करायचा आहे
  • आपल्या माणसांना त्रास होईल असे वर्तन करू नये
  • आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही, हातातोंडाशी आलेला घास खायला आपण असणे महत्त्वाचे आहे
  • कोणतेही गालबोट न लावता ९ ऑगस्टचा बंद आपण सर्वांनी यशस्वी करायचा आहे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -