घरमुंबई'माणदेशी' महोत्सवाची मुंबईकरांना पर्वणी

‘माणदेशी’ महोत्सवाची मुंबईकरांना पर्वणी

Subscribe

मुंबईत रंगला 'माणदेशी' महोत्सव

गावाकडचे किल्ले, गावाची चावडी, घराचा ओटा, घरासमोरील पडवी, गुरे-ढोरे या सर्वच गोष्टींचा अनभुव घ्यायचा असेल, तर कुठेही दूर जाण्याची गरज नाही. कारण ‘माणदेशी फाऊंडेशन’ने तुमच्यासाठी एक आगळीवेगळी पर्वणी आणली आहे. अस्सल ग्रामीण संस्कृतीचा मुंबईकरांना अनुभव घेता यावा याकरता प्रभादेवी येथे रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात “माणदेशी महोत्सव”चे आयोजन केले असून या महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. या महोत्सवाचे आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, डाऊचे सीईओ सुधीर शेणॉय, एचएसबीसीचे सीईओ रोशा, माणदेशी महिला बँकेच्या सीईओ रेखा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

ग्रामीण संस्कृतीचा अनुभव

साताऱ्यातील दुष्काळी भाग असलेल्या माण या गावातील अनेक महिला उद्योजिका या ठिकाणी आपल्या व्यवसायासह दाखल झाल्या आहेत. या महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी ‘गझी लोकनृत्य’ पाहण्याची मुंबईकरांना संधी मिळाली. यासोबतच गावरान गोडवा असलेल्या आरजे केराबाई सरगर यांची जुगलबंदी म्हणजे दुग्धशर्करा योग. माणदेशी कम्युनिटी रेडिओच्या ग्रामीण कलाकारांचे सादरीकरण, माणदेशी चॅम्पीयन महिला कुस्ती देखील अवुभवता येणार आहे. यासोबतच हाताने मडके तयार करणे. स्वत:उभे राहून लाटणे तयार करुन घेणे. टोपली किंवा झाडू वळवून घेणे हे सारे काही गावातले चक्क मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. तसेच जर तुम्ही खवय्ये असाल तर साताऱ्याचा खर्डा, शेंगदाण्याच्या चटणीसह वेगवेगळ्या चटण्या, लोणची, ज्वारीची भाकरी, कुरड्या, भातवड्या, साताऱ्याचे जगप्रसिद्ध कंदी पेढेही तुमच्या प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे आजच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घेतला आहे.

- Advertisement -

काय आहे यंदा महोत्सवामध्ये पाहण्यासाठी

यंदा सुरूवात होतेय ती माणदेशी महोत्सवाच्या प्रवेश द्वारापासून, गावाकडील संस्कॄती आणि विविध स्कल्प्चर्सचा देखावा पाहता येणार आहे. मुंबईकरांना या महोत्सवामध्ये माणदेशीची खासियत असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती आणि खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या हे साहित्य खरेदी करता येणार आहेत. तसेच माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, तसेच चटकदार चटण्या आणि मसाल्यांची चव चाखता येणार आहे. त्याचसोबत घरच्या घरी तयार केलेल्या खास सातारी टच असलेल्या विविध चटण्या, पापड, लोणचं, खर्डा, ठेचा, शेव-पापड ते अगदी पेयांपर्यंत सारं काही उपलब्ध आहे.

  • १० जानेवारी – माणदेशी तरंग वाहिनीच्या ग्रामीण कलाकारांचे कला आणि पथनाट्य सादरीकरण – सायंकाळी ६ ते ७.३०
  • ११ जानेवारी – मृदुला दाढे- जोशी संगित मैफिल आणि केराबाई यांच्यासह जुगलबंदी – सायंकाळी ६ ते ७.३०
  • १२ जानेवारी – महिला कुस्ती – सायंकाळी ६ ते ७.३० तर रात्री ९.३० वाजता माणदेशी महोत्सवाची सांगता.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -