manoj patil-गाड्या धुणारा पोऱ्या ते मिस्टर इंडीया असा आहे ‘मनोज पाटील’चा प्रवास

मनोज कूपर रुग्णालयात आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. पण खडतर परिस्थितीचा सामना करत स्वत:ला घडवणारा मनोज एवढा दुबळ्या मनाचा आहे का? हे जाणून घेणंही गरजेचे आहे.

mister-india-manoj-patil-journey
manoj patil-गाड्या धुणारा पोऱ्या ते मिस्टर इंडीया असा आहे 'मनोज पाटील'चा प्रवास

प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत बॉडीबिल्डींग क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या मराठमोळ्या मिस्टर इंडीया मनोज पाटीलने (२९) आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. विषारी गोळ्या खाऊन त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेता साहील खान (Sahil Khan) याच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहलं आहे. सध्या मनोज कूपर रुग्णालयात आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. पण खडतर परिस्थितीचा सामना करत स्वत:ला घडवणारा मनोज एवढा दुबळ्या मनाचा आहे का? हे जाणून घेणंही गरजेचे आहे.

मनोजचा जन्म १९९२ साली एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने वयाच्या १३ व्या वर्षीच कामाला सुरुवात केली. सुरुवातीला वयाने लहान असल्याने त्याला कोणीही काम देत नव्हते. यामुळे त्याने दारोदारी जाऊन वर्तमानपत्र टाकण्यास सुरुवात केली. पण त्यातून फारसे पैसे मिळत नसल्याने त्याने दूध विकण्यास सुरूवात केली. तर कधी गाड्याही धुतल्या.

ज्या वयात मुलं हौसमौज करतात त्या वयात मनोज लोकांच्या गाड्या धुवायच्या. पैसे जमा करायचा. पण यादरम्यान आपल्या भावाला रोज व्यायाम करताना बघून त्याच्याही मनात फिटनेस प्रती आवड निर्माण झाली. त्यातूनच त्याने वयाच्या १६ व्या वर्षापासूनच फिटनेसचे धडे गिरवायला सुरुवात केली. १८ वर्षानंतर त्याने फिटनेस स्पर्धांमध्येही भाग घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला फारसं यश मिळालं नाही. पण त्याने न खचता त्याने अधिक जोरकस प्रयत्न करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर मनोजने काही स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यातील काही स्पर्धा त्याने जिंकल्यादेखील. यामुळे मनोज पाटीलला लोक ओळखायला लागली. २१ व्या वर्षी त्याने ज्युनियर मिस्टर मुंबई स्पर्धेत सुवर्णपदक कमवत फिटनेसच्या दुनियेत आपलं नाव कोरलं. त्यानंतर त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या. नंतर मिस्टर महाराष्ट्र स्पर्धेतही त्याने रौप्य मिळवलं. त्यामुळे मनोज महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला.

मनोज सोशल मिडियावरही सक्रीय आहे. त्याचा फायदा त्याला २०१५ मध्ये झाला. कारण त्याने सोशल मिडियावर मेन्स फिजिक स्पर्धेबदद्ल माहिती मिळवली. नंतर स्पर्धेत भाग घेतला. पण त्याला दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. २०१६ मध्ये मिस्टर इंडिया मेन्स फिजिक स्पर्धेतही त्याने विजेतेपदक मिळवून करियरचा आलेख उंचावला.

नंतर फिटनेस, बॉडीबिल्डींग क्षेत्रात मनोजच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्याला मॉडलिंगच्या ऑफर येऊ लागल्या आणि मनोज मॉडेल म्हणूनही ओळखला जाऊ लागला. तो अॅथलीटही आहेच. यामुळे त्याच्याकडून फिटनेसचे ट्रेनिंग घेण्यासाठी सेलिब्रिटीजचं नाही तर सामान्य तरूणही मनोजकडे येतात.

पण हीच लोकप्रियता त्याच्या स्पर्धकांना असुरक्षित करत असून त्यातूनच अभिनेता साहील खानबरोबर त्याचे बिनसले असावे अशी शक्यता त्याच्या निकटवर्तियांकडून सांगितली जात आहे.