घरमुंबईदादरमधील मुजोर फेरिवाल्यांविरोधात मनसे आक्रमक

दादरमधील मुजोर फेरिवाल्यांविरोधात मनसे आक्रमक

Subscribe

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या फेरिवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मनसेने जी/उत्तर कार्यालयावर मोर्चा काढला.

दादरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याने रागाच्या भरामध्ये एकाची चाकूने वार करुन हत्या केली होती. या मुजोर फेरिवाल्यांविरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या फेरिवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मनसेने जी/उत्तर कार्यालयावर मोर्चा काढला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्यांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेने केली आहे.

मुजोर फेरिवाल्यांवर कारवाई करा

सोमवारी सोहनीलाल नामक परप्रांतीय फेरीवाल्यांनी रागाच्या भरात एका ग्राहकाची चाकूने वार करुन हत्या केली होती. अशा मुजोर फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी यासाठी मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पालिकेच्या जी/उत्तर कार्यालावर मोर्चा काढला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परप्रांतीय फेरीवाले रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर क्षेत्राच्या आत बसत आहेत. मुंबईतील अशा सर्व मुजोर आणि नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन मनसेने पालिका प्रशासन आणि पोलिसांना दिले.

- Advertisement -

फेरिवाल्यांना पोलिसांची भिती राहिली नाही

तीन पिढ्यांपासून फेरीवाल्यांचा व्यवसाय करणारे वेगळे लोक आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त बाहेरून आलेले युपी, बिहारी आणि बांगलादेशी परप्रांतीय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या फेरीवाल्यांमध्ये गेल्या पाच वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. हत्या करण्याइतपत त्यांची मजल जाते. ही मुगरूमी त्यांच्यात आली कुठून पोलिसांची भीती त्यांना राहिलेली नाही का याकडे पालिका प्रशासन आणि पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिले पहिले पाहिजे अशी मागणी मनसेने केली आहे.

फेरिवाल्यांविरोधात कारवाई होणार

दादर स्थानकाबाहेर कविवर्य केशवसुत उड्डाणपुलाखाली गर्दुल्ले आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्यांविरोधात पालिकेने आणि पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत येत्या १५ दिवसांत अशा फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. कारवाई झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असे आश्वासन जी/उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -