“आम्ही कुणाला भीक घालत नाही…”, मनसे नेते संदीप देशपांडेंचा हल्लेखोरांना इशारा

हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. "अशा हल्ल्यांना मी घाबरत नाही,......

Sandeep-Deshpande-Attack

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना हल्ला झाला. चार अज्ञान इसमांनी रॉड आणि स्टम्पच्या साहाय्याने हा हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्या चेहऱ्यावर रूमाल बांधला होता. यात संदीर देशपांडे यांनी स्वतःचा बचाव केला आणि हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका मिळवला. त्यानंतर त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं.

सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीय. “अशा हल्ल्यांना मी घाबरत नाही, घाबरणारही नाही…आम्ही कुणाला भीक घालत नाही…” असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले. सोबत त्यांनी हल्लेखोरांना इशारा देखील दिलाय. “असे हल्ले करून आम्हाला घाबरवायचा प्रयत्न कोणी करू नये, यात कोणाचा हात आहे, हे सगळ्यांना माहित आहे.” असं देखील यावेळी संदीप देशपांडे यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया पाहता राजकीय वादाची पार्श्वभूमी या हल्ल्यामागे तर नाही ना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायावर स्टम्पचा फटका बसल्याने दुखापत झाली आहे. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आलाय. मात्र रुग्णालयातून बाहेर येताना ते व्हिलचेअरवर बसलेले दिसून आले.

या हल्ल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे संदीप देशपांडे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. त्यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, नितेश राणे आदी नेते त्यांच्या भेटीसाठी आले. राज ठाकरे स्वतः रुग्णालयात थांबले. त्यांनी आपली गाडी संदीप यांना देवून त्यांना घरी सोडण्यास सांगितलं. राज ठाकरे यांच्या गाडीतून संदीप देशपांडे रवाना झाले.

संदीप देशपांडे यांच्यावरील या हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. देशपांडे यांच्यावर नेमका कुणी हल्ला केला, यावरून चर्चांना उधाण आलंय. या हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता, यावरून आडाखे बांधले जात आहेत. घटनास्थळी आणि हॉस्पिटलला पोलीस अधिकारी पोहचले आहेत. घटनास्थळी लागलेल्या सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येणार असून हा हल्ला कुणी केला याचा पोलीस शोध घेणार आहेत.