घरमुंबईमॉन्सूनचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू होणार, अशा आहेत तारखा

मॉन्सूनचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू होणार, अशा आहेत तारखा

Subscribe

यंदा राज्यात सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पावसाची नोंद

महाराष्ट्रातील मॉन्सून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतण्याची सुरूवात होईल असे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत स्पष्ट करण्यात आले. यंदाचा मॉन्सून हा सर्वात विशेष ठरला आहे, कारण सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद यंदाच्या हंगामात झालेली पहायला मिळाली आहे. तसेच मॉन्सूनचा यंदाचा मुक्काम हा सरासरी वेळेपेक्षेही अधिकच होता. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे ९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत मॉन्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने जाहीर केली आहे.

सरासरीपेक्षा ९ दिवस जास्त यंदा मॉन्सूनचा मुक्काम आहे. त्यामुळेच हवामान विभागाने आधी जाहीर केलेली २९ सप्टेंबर ही तारीख बदलत आता नवीन तारीख ९ ऑक्टोबर ही मॉन्सून परतीची असेल असे जाहीर केले आहे. सरासरीपेक्षा यंदा मॉन्सूनचा मुक्काम जास्त झाल्यानेच ही तारीख बदलण्याची वेळ हवामान विभागावर आली आहे. सुरूवातीला राजस्थानमधून मॉन्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल. राजस्थानमधील अंदाजित तारीख ही २९ सप्टेंबर आहे. त्यानंतर महाराष्ट्रातून मॉन्सून आपला प्रवास सुरू करेल असे अपेक्षित आहे. मध्य भारतात पावसाचे कमी झालेल्या प्रमाणावरूनच आता मॉन्सूनचा उलटा प्रवास सुरू होईल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राजस्थानमध्ये पहिल्या आठवड्यात मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर त्यापाठोपाठ महाराष्ट्रातून हा परतीचा प्रवास सुरू होईल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राचे महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांनी दिली.

- Advertisement -

मॉन्सूनसाठी एक्सटेंडेड रेनफॉल फोरकास्टिंगनुसार महाराष्ट्रात मॉन्सूनचा मुक्काम हा २२ ऑक्टोबरपर्यंत असेल. त्यामुळे ९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात महाराष्ट्रातून मॉन्सून परतीच्या प्रवासाला सुरूवात करेल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या पावसाचा फटका बसू शकतो असा अंदाज आयआयटीमधील प्राध्यापकांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १८ टक्के अधिक पाऊस पडला आहे. १ जून ते २७ जून या कालावधीत महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि मुंबई उपनगरात ३६८१.४ मिमी इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. मुंबई उपनगरातच सरासरीपेक्षा ७० टक्के इतक्या अतिरिक्त पावसाची नोंद झालेली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत मुंबई उपनगरात १५०७.२ मिमी पावसाची नोंद झाली. तर कोकणातही सरासरीपेक्षा अतिरिक्त पाऊस पडला. दक्षिण मुंबईतही सरासरीपेक्षा ६१ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्ग येथे ५४ टक्के, रत्नागिरी २५ टक्के, ठाणे २० टक्के, रायगड १७ टक्के आणि पालघरमध्ये सरासरीपेक्षा १४ टक्के पावसाची नोंद यंदाच्या मॉन्सूनमध्ये झालेली आहे. मध्य महाराष्ट्रात ३२ टक्के इतकी सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. अहमदनगरमध्ये सरासरीपेक्षा ८२ टक्के पाऊस पडला. तर मराठवाड्यात जिथे २०१७ आणि २०१८ मध्ये दुष्काळाची परिस्थिती होती, तिथेही ३१ टक्के अतिरिक्त पाऊस पडला आहे. संपुर्ण महाराष्ट्रात फक्त अकोला आणि यवतमाळ याठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. अकोल्यात २६ टक्के कमी पावसाची नोंद झाली. तर यवतमाळ येते २३ टक्के कमी पावसाची नोंद झाली. दोन्ही विदर्भातील जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील मुख्य शहरातून मॉन्सून परतण्याची तारीख ६ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -