घरमुंबईखड्ड्यात मंत्र्यांच्या प्रतिमा साकारणे भोवले; आठ मनसैनिकांवर गुन्हे दाखल

खड्ड्यात मंत्र्यांच्या प्रतिमा साकारणे भोवले; आठ मनसैनिकांवर गुन्हे दाखल

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खड्यांमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून चक्क राज्यातील दोन बड्या मंत्र्यांच्या प्रतिमा साकारून अनोखा निषेध नोंदवला होता. या संबंधी ठाणे पोलिसांनी ८ मनसैनिकांवर चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

संततधार पावसाने जागोजागी पाणी साचल्याने ठाणे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. याचा फटका वाहनचालकासह पादचाऱ्यांनाही होत आहे. याबाबत प्रशासनाला जाग यावी त्या निषेधार्थ बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खड्यांमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून चक्क राज्यातील दोन बड्या मंत्र्यांच्या प्रतिमा साकारून अनोखा निषेध नोंदवला होता. मनसेच्या या आंदोलनानंतर महापालिका वा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलीच नाही. मात्र, या आंदोलनाने गृहमंत्रालय खडबडून जागे झाले आहे. ठाणे पोलिसांनी तत्परतेने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांच्यासह ८ मनसैनिकांवर चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, १० ऑगस्ट रोजी या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी हजर राहण्याचा फतवा काढला आहे.

ठाण्यातील खड्ड्यांचा निषेध नोंदवण्यासाठी मनसेने ग्राफिक्सच्या माध्यमातून टिकुजिनीवाडी येथील निळकंठ ग्रीन येथील रस्त्यांवर खड्यात चक्क ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमा असलेली व्यंगचित्रे रंगवून अभिनव आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटू लागल्याने प्रशासन हादरले. मात्र, या खड्ड्यांवर उपाययोजना करण्याऐवजी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून मनसैनिकांवर उट्टे काढल्याची चर्चा रंगली आहे. चितळसर पोलीस ठाण्यात मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे, मनसे उपशहरअध्यक्ष पुष्कर विचारे, प्रभाग अध्यक्ष अमोल राणे, मनसे शाखाध्यक्षसागर भोसले, सचिन जांभळे, संतोष निकम, गोकुळ बोरसे, निलेश चौधरी आदी मनसैनिकांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (३) १३५ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे अपघात होऊन दुर्घटना घडतात. यात अनेक जण जायबंदी होतात तर, एखाद्याचा मृत्यूदेखील ओढवतो. तेव्हा, संबंधित प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी अथवा ठेकेदारावर पोलिसांनी कधी गुन्हे दाखल केले आहेत का?, असा सवाल करून मनविसेच्या पाचंगे यांनी जनतेसाठी गुन्हेच काय कोठडीत जावे लागले तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -