घरमुंबईपाण्यासाठी शिक्षण, नोकरीवर पाणी !

पाण्यासाठी शिक्षण, नोकरीवर पाणी !

Subscribe

मुलुंडमधील हनुमान पाडा येथील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना पाणी भरण्यासाठी शाळा व नोकरी सोडण्याची वेळ आली आहे.

मेगासिटी मुंबईत काही भाग असा आहे की, जिथे रहिवाशांना चोवीस तास पाणी मिळते, तर काही भागात पाण्याचा इतका तुटवडा आहे की, तेथील मुलांना पाण्यासाठी शाळा-कॉलेजचे शिक्षण सोडावे लागत आहे. घरातल्या मोठ्या माणसांना पाणी भरण्यासाठी नोकरीवर पाणी सोडावे लागत आहे. मुलुंडमधील हनुमान पाडा येथील विद्यार्थी आणि नागरिकांवर अशी वेळ आली आहे. विशेष म्हणजे या विभागाचे लोकप्रतिनिधी खासदार, आमदार, नगरसेवक ‘अच्छे दिन’ चा दावा करणार्‍या भाजपचे आहेत.

सरकारचा विकास आमच्यापर्यंत कधी पोहचणार

सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असताना येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारचा विकास आमच्यापर्यंत कधी पोहचणार, असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे. मुलुंड पश्चिमेकडे शिवाजी टेकडीवरील हनुमान पाडा हा डोंगराळ भाग आहे. या भागाला लागूनच जंगल असून त्यामधून वाघ, बिबटे यासारखे प्राणी येतात. एकीकडे या प्राण्यांचे हल्ले होण्याची भीती कायम सतावत असताना दुसरीकडे वीज, पाणी, रस्ते, गटारे यासारख्या नागरी सुविधांचा अभाव आहे.

- Advertisement -

येथील रहिवाशांना पालिका, बोअरिंग आणि मंडळाचे पाणी मिळते. डोंगराखालील लोकांना पालिकेचे पाणी मिळते, डोंगरच्या मध्यावर असलेल्या लोकांना पालिकेचे आणि बोअरिंगचे पाणी मिळते. तर डोंगरमाथ्यावर असलेल्या लोकांना बोअरिंग आणि मंडळाचे पाणी मिळते. यासाठी महिन्याला पालिकेच्या पाण्यासाठी १०० रुपये, बोअरिंगच्या पाण्यासाठी महिन्याला १४० रुपये तर मंडळाच्या पाण्यासाठी महिन्याला १०० रुपये असे एकूण ३४० रुपये भरावे लागत असल्याचे येथील रहिवासी पूजा मोरे यांनी सांगितले.

पाण्याचे तीन प्रकार

तीन प्रकारच्या पाण्यासाठी महिन्याला ३४० रुपये भरावे लागत असले तरी त्या बदल्यात १५ ते २० मिनिटेच पाणी मिळते. पाण्याची वेळ सकाळी १० वाजताची आहे. पाणी भरावे लागत असल्यामुळे सकाळी कॉलेजला जायला मिळत नाही. यामुळे मुंबई विद्यापीठातून बाहेरुन शिक्षण घ्यावे लागत आहे, असे एफ. वाय. बी. कॉमचे शिक्षण घेणार्‍या गौरी शेलार हिने सांगितले. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थिनी आहेत ज्यांना पाणी भरण्याच्या एकमेव कारणामुळे कॉलेजला जाता येत नाही, असे गौरी सांगते. घरातील भांडीकुंडी, कपडे धुणे तसेच इत्यादी कामे करून येथील महिला पैसे कमवतात. त्यातील बहुसंख्य महिलांना सकाळी कामाला जाऊन पुन्हा १० वाजता पाणी भरण्यासाठी घरी यावे लागते. पाणी भरल्यावर पुन्हा कामावर जावे लागते, असे राधा चाळके व कांता शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

दोन दिवसांतून एकदा पाणी

हनुमान पाडा या विभागाला दोन दिवसांतून एकदा १५ ते २० मिनिटे पाणी येते. बाजूला जंगलात येथील माजी नगरसेविका समिता कांबळे यांनी शौचालय बांधले. मात्र रात्रीच्या वेळी भीती वाटत असल्याने सात आठ महिलांना एकत्र जावे लागते, अशी माहिती हेमू शिंदे यांनी दिली. या विभागात दरडी कोसळण्याची भीती असल्याने स्थानिक आमदार सरदार तारासिंग यांनी २०१४-१५ मध्ये मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाद्वारे छोटीशी संरक्षण भिंत बांधून दिली. परंतु पाण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असे नंदा राजभर यांनी सांगितले.

घराजवळील नाल्यांमधून पाण्याच्या पाईप लाईन गेल्या आहेत. यामुळे लहान मुले, रहिवासी नेहमी आजारी पडत असतात. ७-८ महिन्यांपूर्वी स्थानिक नगरसेवक निल सोमय्या यांची भेट घेतली असता १० – १५ दिवस पाणी योग्य प्रमाणात आले. त्यांनतर पुन्हा १५ ते २० मिनिटे पाणी येते. महापालिकेकडून आलेले पाणी हनुमान पाडा रहिवासी सेवा मंडळाकडून रहिवाशांना दिले जाते. अधिक पैसे देणार्‍या लोकांना वेगळी लाईन दिली आहे, असे विशाखा निकाळजे यांनी सांगितले.

स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा 

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मुंबईत विविध ठिकाणी शौचालये बांधण्यात येत असली तरी शिवाजी टेकडीवरील हनुमानपाडा येथील शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. येथील नागरिकांना शौचासाठी टेकडीवरील जंगलात जावे लागते. त्यामुळे येथे स्वच्छ भारत अभियानाचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळते. पंचशील सोसायटीजवळील हनुमानपाड्यावर बांधण्यात आलेल्या दुमजली शौचालयाचे छत नेहमीच गळत असते. छत कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक नील सोमैया यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे काही फरक पडला नाही, असे येथील नागरिकांनी सांगितले.

धोकादायक झाडे

हनुमानपाड्यामध्ये अनेक जुनी व मोठी झाडे आहेत. या झाडांच्या फांद्या तुटून अनेकदा लोकांच्या घरावर पडत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. इतकेच नव्हे तर या झाडांची मुळे लोकांच्या घरात शिरल्याने घरांची स्थिती धोकादायक झाली आहे. ही झाडे पावसात पडल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे या झाडांच्या फांद्यांची किमान छाटणी तरी करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

निसरड्या व तुटलेल्या पायर्‍या

हनुमानपाडा हा डोंगरावर असल्याने तेथे जाण्यासाठी योग्य प्रकारे पायर्‍या बांधण्यात आलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी पायर्‍या तुटलेल्या आहेत. नाल्यातील पाणी वाहत असल्याने पायर्‍या निसरड्या झाल्या आहेत. त्यामुळे यावरून लहान मुले व वृद्ध पडून जखमी होतात. काही महिन्यांपूर्वी एका महिलेचा या पायर्‍यांवरून घसरून हात मोडला.

विजेच्या लोंबकळणार्‍या वायरी

हनुमानपाडा परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या लोंबकळणार्‍या वायरी असल्याने लोकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते. घराबाहेरून पाणी भरावे लागते. डोक्यावरून पाण्याची भांडी भरून आणताना वायरीत अडकून अपघात होण्याची भीती असते. अनेक ठिकाणी वायरींवरील आवरण निघाल्याने पावसाळ्यात शॉर्टसर्किटची भीती आहे.


– अजेयकुमार जाधव

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -