घरमुंबईमुंबई अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमलाच नो एक्झिट

मुंबई अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमलाच नो एक्झिट

Subscribe

मुंबई महापालिकेने अग्निशमन दलाच्या मुख्यालयातील नियंत्रण कक्ष धोकादायक म्हणून असल्याचे या आधीच जाहीर केले होते. यातच आता अग्निशमन दलाच्या जवानांना आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने पुन्हा एकदा त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

अगदी कावळा, कबुतरापासून संपुर्ण मुंबईला आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीला धावून जाणारी अग्निशमन दलाचा मुख्यालयातील नियंत्रण कक्षच धोकादायक स्थितीत आहे. भायखळा स्थित अग्निशमन केंद्राच्या मुख्यालयातील कंट्रोल रूमलाच टेकूचा आधार मुंबई महापालिकेकडून देण्यात आला आहे. याहून भयानक म्हणजे स्वतः अग्निशन दलाच्या नियंत्रण कक्षालाच आपत्कालीन स्थितीत (एर्मजन्सी एक्झिट) बाहेर पडण्याचा मार्ग नाही. मुंबई महापालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून याआधीच जाहीर केली आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही तडे

मुंबई अग्निशमन दलाची नियंत्रण कक्षाची इमारत 1983 साली बांधून पुर्ण झाली होती. तेव्हापासून अनेकदा या इमारतीची दुरूस्ती करण्यात आली आहे. 2012 मध्येही या इमारतीची दुरूस्ती करण्यात आली असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेने ही इमारत 2014 साली धोकादायक जाहीर केली होती. त्यानंतर या इमारतीच स्ट्र्क्चरल ऑडिट करण्यात आले. या ऑडिटसाठी वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इंस्टिट्यूटची मदत घेण्यात आली होती. व्हीजेटीआयच्या आणि महापालिकेच्या ऑडिटनुसार संपुर्ण इमारत जमीनदोस्त करून नवी उभारण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर तात्पुरत्या डागडुजीने संपुर्ण इमारतीची देखभाल दुरूस्ती करण्यात यावी असे ऑडिटच्या अहवालात नमुद करण्यात आले होते. इमारत वारंवार दुरूस्त करूनही इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहे. ही इमारत दुरूस्तीसाठी असल्याने महापालिकेच्या ई विभागाने या इमारतीत टेकू लावले आहेत. पण दुरूस्तीची निविदा प्रक्रिया अजुनही सुरू आहे अशी माहिती आहे.

- Advertisement -

वायरलेस टॉलरचा डोलारा

या इमारतीवर फायर ब्रिगेडचा वायरलेस रिसिव्हिंग स्टेशनचा टॉवरही आहे. पण टॉवर खालचा भाग खचल्याने या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. कधीही हा भलामोठा टॉवर कोसळू शकतो अशी स्थिती आहे. याआधीच अधिकारी वर्गासाठी असणारी अग्निशमन दलाची इमारत धोकादायक स्थिती आढळल्याने महापालिकेने या इमारतीला धोकादायक म्हणून जाहीर केले होते. म्हणून या इमारतीची दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे. ऑगस्ट अखेरीस हे काम पुर्ण होईल असे अपेक्षित आहे.

एर्मजन्सी एक्झिट नाहीच

अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूममध्ये एकाचवेळी सहा ते आठ जण काम करतात. मुंबईतून दिवसापोटी हजारो कॉल्स येतात. पण ही कंट्रोल रूम तळ मजल्यावर अगदी इमारतीच्या पोटाच्या भागात आहे. इमारतीचा कोणताही भाग कोसळला तरीही या कंट्रोल रूममधील लोकांना बाहेर पडता येणार नाही इतक्या भयानक स्थिती सध्या हे कंट्रोल रूममधील लोक बसतात ही वास्तविकता आहे.

- Advertisement -

इमारतीची दुरूस्तीच

नियंत्रण कक्ष असलेल्या सध्या या भागाची दुरूस्ती करण्यात येत आहे. नियंत्रण कक्ष असलेल्या इमारतीचा भाग हा महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केलेला नाही. पण नियंत्रण कक्षाच्या अद्ययावतीकरणाच्या कामामुळे हा विभाग येत्या पंधरवड्यात नव्या इमारतीत शिफ्ट करण्यात येईल.

– प्रभात रहांगदळे, मुख्य अग्निशमन अधिकारी

आम्ही याच परिसरात राहतो. अग्निशमन दलाच्या इमारतीला तडे पडल्याचे दिसते आहे. ही इमारत मुळातच धोकादायक स्थितीत आहे. इमारतीसोबत कोणतीही दुर्घटना घडली तर आम्ही नक्कीच मदतीसाठी पोहचू.

– समीर पटेल, स्थानिक रहिवासी

या इमारतीची दुरूस्ती वारंवार झाल्याचे आम्ही पाहिले आहे. अनेकदा दुरूस्ती करूनही इमारत कमकुवत झाल्याचे दिसते आहे. सध्या दुरूस्त करण्यात आलेली इमारत कलल्यामुळे संपुर्णपणे रिकामी करण्यात आली होती.

– अब्दुल्ला अन्सारी, स्थानिक रहिवासी

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -